आरसा विधानसभेचा / केज
पोटभरेंची इच्छा , रिपाईचाही दावा , प्रस्थापितांची होणार का अडचण ?
बीड दि. १४ (प्रतिनिधी ) : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी विचारांशी थेट नाते सांगणाऱ्या नेते किंवा संघटनांना अजूनतरी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. प्रमुख प्रवाहातील राजकीय पक्षांचा म्हणूनच हा मतदारसंघ ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघातून लढण्याची इच्छा बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी व्यक्त केलेली आहे, तर दुसरीकडे महायुतीचा घटक असलेल्या रिपाईंनेही या मतदारसंघावर दावा केलेला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांकडून तयारीत असलेल्या इच्छुकांची अडचण होणार का हा प्रश्न आहेच.
बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ. जिल्ह्यात आंबेडकरी विचारांच्या चळवळींची शक्ती आणि प्रभाव मोठा आहे. या चळवळींनी वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून आपल्या 'क्षमतेची ' जाणीव सुद्धा जिल्ह्याला नव्हे तर राज्याला करून दिलेली आहे. मात्र असे असले तरी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात मात्र या विचारधारेशी थेट नाते सांगणाऱ्या नेत्यांना किंवा संघटनांना कधी संधी मिळाली नाही. दिवंगत विमलताई मुंदडा यांनी दीर्घकाळ या मतदारसंघाचे नेतृत्व केले. सुरुवातीला भाजपकडून , नंतर राष्ट्रवादीकडून त्या या मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून निवडणून येत गेल्या. त्यानंतर अल्पकाळासाठी पृथ्वीराज साठे , तर एक टर्म संगीता ठोंबरे यांना मिळाली. आता दिवंगत विमल मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा या भाजपच्या म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. अगदी भाजपच्या विचारधारेला देखील या राखीव मतदारसंघातून संधी मिळते , इतका प्रमुख राजकीय पक्षांचा प्रभाव या मतदारसंघात वाढलेला आहे.
यावेळी मात्र बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आंबेडकरी विचारधारा सांगणाऱ्या संघटनांमधून बाबुराव पोटभरे यांचे नेतृत्व विकसित झालेले आहे. सुरुवातील रामदास आठवले , नंतर प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत काम केलेले बाबुराव पोटभरे यांनी मागच्या एक दशकांपेक्षा अधिकच्या काळात स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे. हे करताना आंबेडकरी विचारधारा परिवाराच्या परिघाबाहेर देखील त्यांनी स्वतःचा 'प्रभाव ' निर्माण केलेला आहे. माजलगावसारख्या मतदारसंघात त्यांना विचारात घेतल्याशिवाय कोणाचीच विजयाची गणिते जुळत नाहीत अशी पृष्ठती, लोकसभा निवडणुकीत देखील त्यांच्या भूमिकेला महत्व असते, त्यामुळे आता त्यांनी केज मधून लढण्याची व्यक्त केलेली इच्छा अनेकांची आधीचं करू शकते.
बाबुराव पोटभरे रामदास आठवलेंपासून दुरावल्यानंतर बीड जिल्ह्यात रिपाईचे संघटन वाढविण्याचे काम पप्पू कागदे दीर्घकाळ करीत आलेले आहेत . रिपाइंच्या या वाटचालीत पप्पू कागदे यांचे राजकीय पुनर्वसन अद्यापही झालेले नाही. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये रिपाईचे घ्यावा आणि तेथून पप्पू कागदे यांना उमेदवारी द्यावी अशी एक मागणी आहे. स्वतः पप्पू कागदे यांनी या मागणीचे सूतोवाच केलेले आहेच. पण या जागेवर विद्यमान आमदार भाजपचे आहेत, त्यामुळे भाजप ही जागा रिपाईसाठी सोडेल का आणि खुद्द रामदास आठवले आपल्या कार्यकर्त्यांसाठी तितकी 'प्रतिष्ठा ' पणाला लावतील का हा प्रश्न आहेच.
काहीही घडले तरी थेट आंबेडकरी विचारधारेशी नाते सांगणाऱ्या चळवळीतील असलेले कोणी या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असेल तर निवडणुकीची सारी समीकरणे बदलू शकतात. राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाल्यापासून बाबुराव पोटभरे या आंदोलनाचे सहानुभूतीदार राहिलेले आहेत. आरक्षणाच्या मागणीचे त्यांनी उघडपणे समर्थन केलेले आहे, ही बाब देखील विसरून चालणार नाही. मात्र यामुळे प्रस्थापित म्हणविणाऱ्या पक्षांची चांगलीच गोची होणार आहे.
प्रजापत्र | Monday, 16/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा