वडवणी दि.१३ (प्रतिनिधी) -बीड जिल्हयातील मुलींचे अल्पवयात होणाऱ्या बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी व मुली कोवळया वयातच विवाहबंधनात न अडकता त्यांना शिक्षणाच्या संधी देऊन स्ववलंबी करण्याचे दृष्टिकोनातुन नेहमी प्रयत्न असावेत. अशा सक्त सुचना भेरासा सेल व दामिनी पथक यांना असतात. त्या अनुषंगाने (दि.१३) शुक्रवार रोजी तिगाव, नाईक तोळा तांडा येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची गोपनिय माहिती भरोसा सेलच्या व दामिनी पथकाच्या अधिकारी यांना मिळाली.त्यांनी घटनास्थळी जाऊन हा बालविवाह रोखला.
सविस्तर माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील तिगाव,नाईकतोळा तांडा येथे एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह (दि.१३) शुक्रवार रोजी होणार असल्याची गोपनिय माहिती भरोसा सेलच्या व दामिनी पथकाच्या अधिकारी वर्षा व्हगाडे यांना मिळाली. याची माहिती वरिष्ठांना देऊन स्टाफसह व चाईल्ड लाईन संबंधाने काम करणारे तत्वशिल कांबळे यांना सोबत घेऊन वडवणी पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी वडवणी पोलीस ठाण्याचे श्री अमन सिरसट सहायक पोलीस निरीक्षक व त्यांचा स्टाफ असे सर्व बालविवाहाच्या ठिकाणी रवाना झाले. तिगाव तांडयावर गेल्यावर तेथे नातेवाईक व वऱ्हाडी मंडळींची गर्दी दिसुन आली तेथे मुलीचे शैक्षणिक कागदपत्राची पडताळणी केली असता, मुलीचे वय हे १७ वर्षे १० महिने असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी नवरा मुलगा व नवरी मुलगी तसेच त्यांचे आईवडिल यांना समक्ष बोलावुन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी आम्ही ऊसतोडणी करत असल्याने प्रत्येक वेळेस मुलीला सोबत घेऊन जाणे अवघड होत आहे. त्यामुळे तिचे लग्न लावुन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यावर दोन्ही अधिकाऱ्यांनी अज्ञान, रोजंदारी या कितीही अडचणी असल्या तरी १८ वर्षापर्यंत मुलगी शारिरिक व मानसिक दृष्टया विवाह करण्यास सक्षम राहत नाही त्याचा तिच्या शारिरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. तसेच होणारे अपत्य निरोगी व सदृड होत नाही. या सर्व गोष्टींचा एकुण कुटुंबावरच नकारात्मक परिणाम होतो. व त्यातुन विवाहितेच्या आत्महत्या घटस्फोट असे प्रकार घडतात. या गोष्टी पालकांना व नातेवाईकांना समुपदेशन केल्याने त्यांनी देखील अठरा वर्षे झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत तिचे लग्न करणार नाहीत व ती सज्ञान झाल्यानंतर तिचे इच्छेने तिचा विवाह करु अशी हमी दिली. तसेच यानंतर आमच्या गावात कधीही बालविवाह होणार नाही व शेजारच्या गावात बालविवाह होत असेल तर आम्ही सजग नागरिक म्हणुन पोलीसांना कळवु अशा विश्वास गावकऱ्यांनी दिला. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, बीड यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी वर्षा व्हगाडे, वडवणी ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. अमन सिरसट, चाईल्ड लाईन समुपदेशक तत्वशिल कांबळे, पोलीस अंमलदार सतीश बहिरवाळ, संजय सुरवसे, विलास खरात, राम शिनगारे, सविता सोनवणे, शालिनी उबाळे यांनी केली.