काकांशी द्रोह करून सत्तेसाठी भाजपशी केलेली सलगी सामान्य जनतेला आवडली नाही आणि दुसरीकडे भाजपवाले देखील आपल्याला आपले मानायला तयार नाहीत. शिंदेंच्या शिवसेनेचे तर आपण 'लाडके ' कधीच नव्हतो, त्यामुले विरोधकांशी लढायचे का स्वकियांशी अशा चक्रव्यूहात अजित पवार अडकले आहेत . त्यामुळे मागच्या काही दिवसात अजित पवारांना कुटुंबाच्या संदर्भाने ज्या चुकांची जाणीव होत आहे, ती त्यांची पश्चातबुद्धी समजायची का ती अजित पवारांची राजकीय अपरिहार्यता आहे ?
अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्याशी राजकीयद्रोह केला त्याला एकवर्षापेक्षा अधिकच काळ उलटला आहे. मात्र या द्रोहातून जे काही घडले , त्यातून पवार कुटुंब फुटले, त्याच्या वेदना आता कुठे अजित पवारांच्या चेहऱ्यावर उमटू लागल्या आहेत. एखादा व्यक्ती पडल्यावर त्याला मुकामार बसतो, ज्यावेळी असे होते, तेव्हा फारशा वेदना होत नाहीत,मात्र काही काळाने ती ठणक जाणवयला लागते. आणि नंतर जेव्हा केव्हा आभाळ येते, त्या त्या वेळी त्या ठणकेची जाणीव होतच असते. सध्या अजित पवारांना अशीच ठणक जाणवत असावी. काही दिवसांपूर्वी त्यांना पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविले ही चूक झाल्याचा साक्षात्कार झाला होता. अजित पवार तसे मोकळे , त्यामुळे त्यांनी हा साक्षात्कार जो मनात प्रकटला , तो बोलून देखील दाखविला. आता गडचिटोळीमध्ये धर्मराजबाबा आत्राम यांच्या कुटुंबासंदर्भाने बोलताना, 'कुटुंबात फूट पडू देऊ नका , माझ्या बाबतीत जे घडले ती माझी चूक होती ' असे अजित पवार बोलून गेले आहेत .
सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे काही सुरु आहे, ते महाभारतातील राजकारणाला लाजवील असेच आहे. मात्र महाभारत घडले ते म्हणे त्रेतायुग होते, त्यावेळी कौरव कोण पांडव ठरविणे, आणि कोणाची बाजू सत्याची हे ठरविणे कृष्णाला जमले, आता कलियुग आहे असे म्हणतात , त्यामुळे इथे कोणाला कौरव ठरवायचे आणि कोणाला पांडव ठरवायचे हे अवघड आहे. पण या साऱ्या रणधुमाळीत अजित पवारांचा मात्र अभिमन्यू झाला आहे हे नक्की. त्या चक्रव्यहत किमान अभिमन्यूवर वार करायला शत्रू पक्षातले तरी होते, इथे तर अजित पवार ज्याला मित्रपक्ष म्हणतात तेच अजित पवारांवर राजकीय वार करीत आहेत. अजित पवारांनी आपल्या काकांना सोडून सत्तेची कास धरायची म्हणून भाजपचा हात भलेही धरला असेल , मात्र याला मैत्रीचे स्वरूप कधीच आलेले नाही. संघ परिवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना तर अजित पवारांचे असे 'हात धरून पळून येणे ' आवडलेले नाहीच, पण भाजपने त्यांना थारा द्यावा हे देखील मेनी नाही. कार्यकर्त्यांचे एकवेळ जाऊद्या , पण भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील ' भाजपची शिवसेनेसोबतची युती नैसर्गिक आहे, राष्ट्रवादीसोबतची सत्ता हा राजकीय निर्णय आहे ' असे सांगून महायुतीमध्ये अजित पवारांची जागा काय असेल हे अनेकदा दाखवून दिले आहेच.
आता मागच्या काही काळात तर त्याचा कहर होत आहे. माणूस कोणीही असला तरी शेवटी त्याने उपमर्द सहन करावा तरी किती ? अजित पवारांच्या सहवासाने कोणाला मळमळ होते, तर अजित पवारांकडे असलेल्या खात्याला कोणी 'नालायक' म्हणते. हे झाले शिवसेनेच्या मंत्र्यांचे , भाजपचे जिल्हाध्यक्ष देखील राष्ट्रवादीचा आपल्याला काय उपयोग असे थेट म्हणत अजित पवारांच्या पक्षाची 'किंमत ' काढतात , मग हे सारे संकेत आता महायुतीला अजित पवार नकोसे झाले आहेत याचेच म्हणायचे नाही तर काय ? बरे हे जे सामान्यांना समजते , ते अजित पवारांना काळात नसेल असे थोडीच ?
त्यामुळे आता शरद पवारांची साथ सोडली, भाजपला मुळात 'पवारांचे' राजकारण संपवायचे होते म्हणून महाशक्तीच्या प्रभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवारांना ताबा मिळविता आला, मात्र जनतेला हे मेनी झाले नाही. लोकसभेच्या निवडणुकीत जनता अजूनही थोरल्या पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जनता सोबत येत नाही , महायुतीमध्ये उद्या जागा वाटपात फार काही मिळेल याची अपेक्षा नाही, त्यामुळे आताच सोबत आलेले एक एक शिलेदार पुन्हा काकांकडे जात आहेत, जाण्याच्या मार्गावर आहेत. मग अशावेळी राजकारणात टिकायचे तर काही तरी करावेच लागणार . महायुतीमधील अनेक जण अजित पवारांना ढकलून ढकलून युतीच्या बाहेर पडण्याच्या उंबऱ्यावर आणणार असतील तर त्यांना कोठेतरी पर्याय शोधावेच लागणार ना ? ममग त्या राजकीय अपरिहार्यतेच्या परिस्थितीमध्ये पुन्हा 'काका मला वाचवा ' म्हणनायची वेळ आली तर त्याची पुरेशी पार्श्वभूमी आणि वातावरण निर्मिती देखील करायला नको का ? कदाचित त्या राजकीय अपरिहार्यतेतूनच त्यांना आपल्या साऱ्याच चुकांची जाणीव होत असावी किंवा लोकसभेत बसलेल्या मुकामाराचा ठणका जरा जास्तच झोंबत असावा .