बीड दि.३० (प्रतिनिधी)- वादग्रस्त ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेवर दाखल अनेक गुन्ह्यात पोलीसांना हवा असलेला 'ज्ञानराधा'चा उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी आणि त्याचा मुलगा वैभव अखेर पोलीसांच्या ताब्यात आले आहेत. या दोघांना पुणे पोलीसांनी ताब्यात घेतले असून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यशवंत कुलकर्णी ला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
ठेविदारांच्या ठेवी परत न केल्याने बीडच्या 'ज्ञानराधा' मल्टीस्टेटवर बीड राज्यभरात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात 'ज्ञानराधा'चे अध्यक्ष सुरेश कुटे सध्या कोठडीत आहेत तर अनेक गुन्ह्यातील आरोपी 'ज्ञानराधा'चा उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी आणि त्याचा मुलगा वैभव कुलकर्णी पोलीसांना सापडत नव्हते. शुक्रवारी या दोघांचा ठावठिकाणा पोलीसांना मिळाला. त्यानुसार पुणे पोलीसांनी या दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आता बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या दोघांना अटक करण्यासाठी रवाना झाले आहे.
यशवंत कुलकर्णी राज्यात दाखल ५० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याच्या अटकेसाठी ठेविदार संघर्ष समितीच्या माध्यमातून सचीन उबाळे आणि इतर ठेवीदारांनी वारंवार आंदोलन केले आहे.
बातमी शेअर करा