Advertisement

संपादकीय अग्रलेख -खेळ नेतृत्वाचा 

प्रजापत्र | Monday, 19/08/2024
बातमी शेअर करा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी बाकी असतानाच आणि सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी केली असतानाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, हा विषय समोर येऊ लागला आहे.सध्या विरोधी बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा विषय जास्त चर्चेत ठेवला आहे.सत्ताधारी महायुतीमध्ये अद्याप या विषयाची चर्चा सुरू झाली नसली,तरी अंतर्गत पातळीवर काही प्रमाणात मात्र निश्‍चितच कुजबूज सुरू आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सत्ताधारी महायुतीचा महाराष्ट्रात जोरदार पराभव केल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्येही अशाच प्रकारच्या जोरदार यशाची खात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.त्यातूनच हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, हा विषय समोर येतोय.
 

 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील,असे सांगत आहेत.महाविकास आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांनी मात्र उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अद्याप मान्यता दिलेली नाही.उलट काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये ही मागणी नाकारली आहे.शरद पवार यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक सामूहिक नेतृत्वाच्या पद्धतीने लढविली जाईल,असे सुतोवाच केले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फॉर्म्युला सुचवला आहे.
केवळ लोकसभा निवडणुकीच्या यशाचा विचार करता सर्वात जास्त यश काँग्रेस पक्षाला मिळाले आहे.अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा अजित पवार यांच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करता आलेले नाही याची जाणीवही अधूनमधून नाना पटोले आणि काँग्रेसचे इतर नेते करून देत असतात.साहजिकच विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढे करून मतदारांना सामोरे जाण्याबाबत अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतेही एकमत नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या २५ वर्षांच्या कालावधीमध्ये आघाडीचे राजकारण करून सत्तेत असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाने नेहमीच विधानसभा निवडणुकीमध्ये जरी जास्त जागा जिंकल्या असल्या,तरी कधीच मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला नव्हता.काँग्रेस बरोबर युती असताना त्यांनी काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या तरी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवून त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनाच मुख्यमंत्रिपद बहाल केले होते. याच कारणामुळे अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत नाराजीही प्रकट केली होती. साहजिकच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्‍याला थेट पाठिंबा न देता शरद पवार यांनी सामूहिक नेतृत्वाच्या जोरावरच निवडणूक लढवली जाईल, असे संकेत दिले आहेत.यंदा अजित पवारांनी सावतासुभा मांडल्यामुळे शरद पवार कदाचित मुख्यमंत्री पदासाठी आपल्या पक्षातील कोणाचा चेहरा पुढे करतात का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

 

तर दुसरीकडे महायुतीत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांनी आपल्यापेक्षा छोटा पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद बहाल केले आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या विषयावरून वाद होण्याची शक्यता कमी आहे.जरी एकीकडे दीडशेपेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्धार भाजपाच्या नेत्यांनी केला असला आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उर्वरित जागा देण्यात येणार असल्या तरीही मुख्यमंत्रिपदाचा विषय अद्याप महायुतीच्या नेत्यांनी चर्चेला घेतलेला नाही.निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरच या विषयाचा तुकडा पाडण्याचा निर्णय महायुतीच्या सर्वच नेत्यांनी घेतला असावा.निवडणुकीपूर्वी या विषयावरून वाद नको अशीच भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतलेली दिसते.या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेतेसुद्धा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हा विषय जास्त ताणणार नाहीत आणि सामूहिकपणे मतदारांना सामोरे जातील अशी अपेक्षा या निमित्ताने करावी लागणार आहे.बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री कोण, हे ठरवणे जास्त योग्य हे सर्वांनी समजून घ्यायला हवे.मात्र महाविकासआघाडीत मुख्यमंत्री पदावरून रोज सुरु असलेले दावे-प्रतिदावे विधानसभेच्या दृष्टीने त्यांच्या पक्षासाठी काही प्रमाणात घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.महायुतीने खुर्चीच्या खेळापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर आणि योजनांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले असून महाविकासआघाडीनेही खुर्चीपेक्षा सामान्यांच्या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित केले तर विधानसभेत त्यांना अधिक फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 

Advertisement

Advertisement