Advertisement

 संपादकीय अग्रलेख- राजकीय सहिष्णुतेची दिवाळखोरी

प्रजापत्र | Monday, 12/08/2024
बातमी शेअर करा

कोणीतरी कोणाच्या गाडीवर सुपार्‍या फेकतो त्याचा परिणाम म्हणून दुसरीकडे एखाद्या नेत्याच्या ताफ्यावर शेण फेकलं जातं. कोणी काय केलं तर कोणाला परवडणार नाही अशी विधानं आता रोजच ऐकायला मिळतात. जो महाराष्ट्र राजकीय सौहार्दासाठी, राजकीय सहिष्णुतेसाठी ओळखला जायचा त्या महाराष्ट्रात आता राजकीय सहिष्णुतेची दिवाळखोरी पहायला मिळत असून टगेगिरीला महत्च आले आहे.

 

 

राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे महाराष्ट्रातील केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. असे वातावरण ज्यावेळी ढवळून निघते त्यावेळी काही काळाने का होईना त्यातील गाळ तळाशी बसणे अपेक्षित असते पण महाराष्ट्रातील सारेच वातावरण इतके गढूळ झाले आहे की आता या वातावरणातला गाळ आणि पाणी वेगळे काढता येईल का? हाच प्रश्‍न आहे. ज्या नेत्यांकडून आपण चांगल्या वागणूकीची अपेक्षा करतो, ज्यांनी सामाजिक वातावरण चांगले करणे अपेक्षित आहे असे म्हणतो ज्यांच्याकडे राज्यातला चेहरा म्हणून पाहिले जाते त्यांच्याकडून सामोपचाराऐवजी उद्रेकाची भाषा केली जाणार असेल तर महाराष्ट्राला शांतता लाभणार कशी कोण्या एकाला यासाठी जबाबदार धरावे आणि कोणाला समंजसपणाचे प्रमाणपत्र द्यावे अशी परिस्थिती मुळातच नाही. काही अपवाद वगळता सर्वच पक्षाचे नेते टगेगिरीला अधिक महत्व देत असल्याचे चित्र आहे.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौर्‍यात त्यांनी आरक्षणावरून काही विधाने केल्यानंतर त्यांना मराठा समाजाचा झालेला विरोध एक वेळ समजण्यासारखा आहे. खरेतर तेथे देखील प्रत्येकाची ज्याची त्याची भूमिका आहे हे मान्य करायला हरकत नाही पण तरीही किमान बहुसंख्य समाजाच्या अस्मितांचा लढा ज्यावेळी सुरू असतो त्यावेळी सावध आणि समंजस भूमिका अपेक्षित असतात. या नावाखाली एक वेळ मराठा समाजाने केलेला विरोध समजू शकतो मात्र एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात दुसर्‍या राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी गोंधळ घालणे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. बीडमध्ये जो सुपार्‍याफेकण्याचा अति उत्साही कार्यक्रम झाला त्याच्याशी पक्ष म्हणून शिवसेना (उबाठा)चा संबंध नाही असे म्हणत खा.संजय राऊत यांनी हात झटकले असले तरी त्याचे पडसाद उमटायचे ते उमटलेच. बीडमध्ये सुपार्‍या फेकल्या म्हणून ठाण्यात नारळ आणि शेण फेकले गेले. त्यात पुन्हा राज ठाकरेंनी ‘माझे मोहळ उठले तर तुम्हाला परवडणार नाही, पवार, ठाकरेंना राज्यात एकही सभा घेता येणार नाही’ असा इशारा दिला आता राज ठाकरेंचा हा इशारा म्हणजे मनसे सैनिकांना विरोधकांच्या सभा उधळून लावायला प्रोत्साहनच समजायचे का? आणि असेच होणार असे तर या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे चित्र काय असेल? 

 

या महाराष्ट्राने कट्टर राजकीय विरोधकांनादेखील एकमेकांसोबत सामोपचाराने वागताना पाहिले आहे. जे बाळ ठाकरे शरद पवारांना कायम मैद्याचं पोतं म्हणून हिणवायचे त्या बाळ ठाकरेंनी सुप्रिया सुळेंच्या निवडणूकीत त्यांना जाहीरपणे मदत करण्याची भूमिका घेतली होती. यातील राजकीय भाग बाजूला ठेवला तरी राजकीय विरोध म्हणजे आखाड्यातली कुस्ती नाही याचे भान यशवंतरावांपासून ते अगदी काल परवा पर्यंत दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन अशा पर्यंतच्या सर्वच नेत्यांमध्ये होते. ज्यावेळी काँग्रेस आणि शेकाप हे दोन मोठे पक्ष एकमेकांच्या विरोधात होते त्यावेळी देखील कधी राजकारणाला कुस्तीच्या आखाड्याचे स्वरूप आले नाही. नंतरच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांच्यात शाब्दिक वाद भलेही झाले असतील पण कोणाच्या सभाच उधळून द्यायच्या, कोणाच्यातरी दौर्‍यात घुसखोरी करायची असे प्रकार होत नव्हते. आता महाराष्ट्राचे चित्र भीषण आणि भेसूर केले जात आहे.

Advertisement

Advertisement