Advertisement

संपादकीय अग्रलेख- हुकूमशाहीचा शेवट  वाईटच

प्रजापत्र | Wednesday, 07/08/2024
बातमी शेअर करा

 आकाशाला भिडलेली  महागाई, विदेशी गंगाजळीचा आटत चाललेला स्रोत , विरोधी पक्षातील नेत्यांचे एन्काउंटर , त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून त्यांचे हाल करणे आणि निवडणुकांवर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असतानाही मिळालेला विजय म्हणजे जनसमर्थन असे दाखविणे या साऱ्या हुकूमशाहीचा कधीतरी शेवट होणार असतोच. बांग्लादेशामध्ये तो झाला. शेख हसीना यांना अखेर देश सोडून परागंदा व्हावे लागले . आता लगेच बांग्लादेशामध्ये लोकशाही प्रस्थापित झालेली नाही, मात्र हुकूमशाहीच्या माध्यमातून आणि सत्तेचा गैरवापर करून काही काळ जनभावना दडपता येतील, पण कोणत्याही आणि कोणाच्याही हुकूमशाहीचा शेवट वाईटच असतो हाच धडा बांग्लादेशाने  शिकविला आहे.
 

 

सत्ता व्यक्तीला भ्रष्ट बनविते असे म्हणतात , पण सत्ता एखाद्या लोकशाहीवादी व्यक्तीला हुकूमशाह देखील बनवू शकते हे बांगलकदेशातील शेख हसीना यांच्या ताज्या उदाहरणातून समोर आले आहे. एकेकाळी बांग्लादेशमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी लढणारी नेता म्हणून उदयास आलेल्या शेख हसीना नंतरच्या काळात इतक्या बदलतील याची कल्पना देखील करवली गेली नसती, मात्र सत्तेचा मोह कोणालाही काहीही करायला भाग पाडू  शकतो हेच खरे. मागच्या काही महिन्यांपासून बांग्लादेश धुमसत आहे. जानेवारीमध्ये या देशात सार्वत्रिक निवडणूक झाल्या , त्या निवडणुकांवर तेथील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या बीएनपी या पक्षाने बहिष्कार टाकला होता, त्यामुळे शेख हसीना यांच्या आवामी लीगला तसा विरोधकच नव्हता , त्यामुळे त्यांची पुन्हा सत्ता आली, सलग चौथ्यांदा त्या पंतप्रधान बनल्या.  'आम्ही लोकशाही पद्धतीने सत्ता मिळविली ' असे म्हणायला त्या मोकळ्या होत्या, मात्र मागच्या काही दशकात बांग्लादेशमध्ये त्यांची सारी वागणूक एखाद्या हुकूमशहा सारखी होती.
२००९ मध्ये पुन्हा सत्तेवर आल्यानंतर शेख हसीना यांचे एकूणच वागणे बदलत गेले. एकेकाळी म्हणजे १९७८ मध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी झगडणाऱ्या शेख हसीना , २००९ नंतर मात्र आपल्या नजीकच्या लोकांनाच सत्तेचे लाभ  देण्यापासून ते सामान्यांच्या नागरी  हक्कांचे हनन करण्यासाठी म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. कोणताही  हुकूमशहा जसे देशाला  प्रगतीचे, आपण जगात कसे श्रेष्ठ होत आहोत याचे खरे खोटे स्वप्न दाखवितो तसेच स्वप्न शेख हसीना यांनी देखील दाखविले. त्यांच्या कारकिर्दीत बांग्लादेशचा जीडीपी वाढला, काही प्रमाणात आर्थिक आघाडीवर बदल देखील झाले. हे होत असताना एकेकाळच्या लोकशाहीच्या पुरस्कर्त्या शेख हसीना हुकूमशाहीच्या वाटेवर चालू लागल्या . आपल्या राजकीय विरोधकांचा खात्मा करण्यासाठी त्यांनी तयार केलेली 'रॅपिड एक्शन बटालिअन ' असेल किंवा न्यायालयांचा वापर करून विरोधकांची केली जाणारी फरफट असेल, अगदी नोबेल विजेते मोहंमद युनूस यांच्यावर १०० पेक्षा अधिक गुन्हे नोंदवून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करण्यात आले. पोलीस आणि इतर यंत्रणांचा वापर करून शेख हसीना यांनी आपल्या १०० पेक्षा अधिक विरोधकांचे एन्काउंटर घडविले असाही आरोप आहेच.

 

एकीकडे हे सारे होत असतानाच दुसरीकडे महागाईमध्ये झालेली मोठी वाढ, त्याचवेळी बांग्लादेशसमोर विदेशी गंगाजळीचा निर्माण झालेला प्रश्न, विदेशी कर्जत झालेली वाढ, संपुष्टात आलेल्या नोकऱ्या , पर्यायाने वाढलेली बेरोजगारी असे प्रश्न गंभीर होऊ लागले आणि यातूनच मग विद्यार्थी आंदोलन सुरु झाले. खरेतर या आंदोलकांशी सामोपचाराने चर्चा शक्य होती, मात्र एकदा का सत्ता डोक्यात भिनली की मग आंदोलकांना 'आंदोलनजीवी ' म्हणण्याची हुकूमशाही मानसिकता डोके वर काढू लागते, शेख हसीना तर त्याच्याही एक पाऊल पुढे गेल्या आणि आंदोलक विद्यार्थ्यांना 'दहशतवादी ' ठरवून  मोकळ्या झाल्या . आंदोलकांच्या प्रश्नांना भिडण्याची क्षमता नसेल किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर त्यांना थेट 'देशविरोधी' ठरविण्याची आणि तसे कायदे करून आंदोलने चिरडण्याचा हुकूमशाही मानसिकता आताशा जगभरातील शासकांमध्ये वाढीस लागली आहे. तेच शेख हसीना करू पाहत होत्या. त्यांनी आंदोलन चिरडण्यासाठी सैन्याला बोलावले . यात २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे हत्याकांड झाले , आणि अखेर जनतेचा क्षोभ टोकाला गेला. जनआक्रोशापुढे, जनरेट्यापुढे शेख हसीना यांना केवळ राजीनामाच द्यावा लागला नाही तर देश सोडून परागंदा व्हावे लागले . एकेकाळची लोकशाहीची पुरस्कर्ती हुकूमशाहीच्या नदी लागून आता विदेशात आश्रय मागत आहे. हुकूमशाहीचा अंत वाईटच असतो म्हणतात ते यासाठीच .
मुसोलिनी , स्टॅलिन , हिटलर , फ्रान्सिस्को फ्रँको . माओ झेडॉंग , किम जंग अशी कितीतरी नावे या यादीत घेता येतील, ज्यांनी ज्यांनी हुकूमशाही लादली किंवा लादण्याचा प्रयत्न केला, त्यांना जनतेतून आव्हान मिळालेच. बांग्लादेश हा त्या ओळीतील पुढचा देश आहे. शेजारच्या पाकिस्तानमध्ये तर अनेकदा हुकूमशाही अवतरली आणि त्यातून त्या देशाचे पुरते वाटोळे देखील झाले. आज आपण बांग्लादेशमधील कलहाचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहेच, एकतर बांग्लादेश आपले शेजारी राष्ट्र आहे. आपल्या दोन्ही देशांची ४ हजार किलोमीटर पेक्षा अधिकची सीमारेषा आहे. त्यामुळे त्या देशात काही घडले की त्याचे पडसाद आपल्याकडे उमटणारच आणि दुसरे म्हणजे हुकूमशाही लोकांना सदासर्वकाळ आवडत नसते, रुचत नसते, धार्मिक, वांशिक हेकेखोरीवर काही काळ लोकांना गुंगवता येते , मात्र त्याला अंत असतोच असतो.
 

 

Advertisement

Advertisement