Advertisement

संपादकीय अग्रलेख- संशयकल्लोळ

प्रजापत्र | Monday, 17/06/2024
बातमी शेअर करा

    भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 'चारसौपार' जाता आले नाही, त्यामुळे आता तरी कोणी ईव्हीएमला दोष देणार नाही हे निवडणूक आयोगासह इतर अनेकांचे विधान हे एका गंभीर मुद्द्याचे पोरकटीकरण कसे होते हे सांगायला पुरेसे आहे. भारतातील विरोधी पक्षांना ईव्हीएमच्या प्रश्नावर अडाणी ठरविण्याची अहमहिका निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांमध्ये लागलेली असतानाच तिकडे अमेरिकेतील बडे प्रस्थ असलेल्या एलन मस्कने ईव्हीएम हे एआय किंवा इतर तंत्राने हॅक केल्या जाऊ शकतात असा इशारा दिला आहे. यामुळे आता आगामी काळात पुन्हा ईव्हीएम भोवती संशयकल्लोळ वाढणार आहे. 
       

 

भारतातील लोकसभा निवडणूक संपली आहे. आता तिकडे अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. अमेरिकेत ईव्हीएम द्वारे मतदान घेतले जाते, मात्र त्याला अनेक पातळीवर विरोध आहे. त्यातच अध्यक्षीय निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार जॉन एफ केनेडी ज्युनिअर यांनी ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात त्यामुळे निवडणुकीत त्याचा वापर नको असे विधान केले. केनेडी हे स्वतः उमेदवार आहेत, त्यामुळे कदाचित पराभवाच्या भीतीने ते आतापासूनच असली विधाने करीत आहेत असला काही भक्तछाप शेरा मारुन हा विषय बंद झालाही असता कदाचित, मात्र या वादात एलन मस्क यांनी उडी घेतली आणि केनेडी ज्युनिअर यांच्या वक्तव्याला एक्स समाजमाध्यमावर पुढे नेत  एआय सारख्या तंत्रज्ञानाने किंवा मानवी हस्तक्षेपाने ईव्हीएम  हॅक केले जाऊ शकतात असे सांगितले आहे. आता एलन मस्क हे काही अमेरिकेतली साधी आसामी नाही, तर ज्याच्या विधानाची देशपातळीवर दखल घेतली जाते असे बडे प्रस्थ आहे. टेस्ला या जगविख्यात उद्योगसमुहाचे ते सर्वेसर्वा आहेत, म्हणजे तांत्रिक बाबतीत त्यांना अडाणी नक्कीच ठरविता येणार नाही, त्यामुळे आता एलन मस्क यांच्या दाव्यावर अमेरिकेत मोठी चर्चा सुरु आहे. 

 

 

       मुळात अमेरिकेत ही चर्चा होण्याच्या अगोदर भारतात अठराव्या लोकसभेसाठी मतदान झाले. ही लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या कितीतरी अगोदरपासून, किंबहुना मागच्या लोकसभा निवडणुकीवेळीच भारतात देखील ईव्हीएम संदर्भाने मोठया प्रमाणावर संशयाचे वातावरण आहे. संशय निर्माण करणारे घटक, परिस्थिती मोठी आहे, मात्र ईव्हीएम मध्ये छेडछाड करता येते हे सिद्ध करता येत नाही आणि केवळ यामुळेच आपल्याकडे ईव्हीएम ला कायम पुराव्याअभावीचे निर्दोषत्व मिळत गेले आहे. यावेळी तर भाजपला 'चारसौपार' जाता आले नाही, किंबहुना स्वबळावर बहुमत देखील मिळाले नाही, हे म्हणजे जणू ईव्हीएमच्या निर्दोष असण्याचे प्रमाणपत्रच असल्याचा पोरकट युक्तीवाद सध्या देशात सुरु आहे. विशेष म्हणजे देशाच्या निवडणूक आयोगाने 'निकालानंतर ईव्हीएम दोषांपासून वाचले ' असले बालिश विधान करुन या पोरकटपणाला अधिकची हुल दिली. मात्र हा पोरकटपणा थंडावत नाही तोच आता मुंबईतील खासदार झालेल्या रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याचे प्रकरण समोर येत आहे. या निवडणुकीत वायकर हे टपालीच्या जोरावर काठावर निवडून आले. तर त्यांच्या मेहुण्याने ईव्हीएम ला जोडलेला फोन वापरला असा दावा केला जात आहे. यातून आता खरोखर काही समोर येईल का नाही माहित नाही, पण एकीकडे वायकर प्रकरण समोर येत असतानाच तिकडे अमेरिकेतही ईव्हीएमवर संशय निर्माण होत असेल तर या संशयकल्लोळात खरोखरच लोकशाहीचे आणि निवडणुकांचे भवितव्य आणि पावित्र्य देखील काय असेल?

Advertisement

Advertisement