Advertisement

 अनैतिक संबंधातून महिलेने केला प्रियकराचा खून !

प्रजापत्र | Thursday, 06/06/2024
बातमी शेअर करा

परळी दि.६ (प्रतिनिधी)- अनैतिक संबंध असलेल्या महिलेने प्रियकराला गावी बोलावून घेत विष पाजले. काही दिवस उपचार घेतल्यानंतर प्रियकराचा रूग्णालयात मृत्यु झाला. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलेसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मारोती भरत चौधरी (वय ३२ रा. कारवेटवाडी ता. सोनपेट जि. परभणी) असे मयताचे नाव आहे. मयताचा भाऊ शेषेराव भरत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मारोतीचे प्रियंका प्रभाकर चौधरी (रा. बुक्तारवाडी ता. सोनपेठ जि. परभणी) हिच्यासोबत दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोन महिन्यापूर्वी प्रियंकाचे इतर तरूणासोबत प्रेमसंबंध असल्याचे मारोतीस माहित झाल्याने प्रियंकासोबत वाद झाला.

 

त्यानंतर प्रियंकाने तिचे नातेवाईक यशवंत मनोहर देवकते, सोनेराव मनोहर देवकते, रेखा मनोहर देवकते, मनोहर सोनेराव देवकते, कृष्णा श्रीरामे, नाईकवाडे, गौरव यांच्या मदतीने देवकते राहत असलेल्या परळीतील धर्मापुरी फाट्याजवळ मारोतीला बोलावून घेतले.तिथे त्यास मारहाण करत किटकनाशकाच्या बाटलीतील विषारी औषध जीवे मारण्याच्या उद्देशाने पाजले. जखमी अवस्थेत मारोतीस रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रियंका चौधरीसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती परळी ग्रामीणचे निरीक्षक मनिष पाटील यांनी दिली.
 

 

Advertisement

Advertisement