बीड-वडवणी तालुक्यातील तेलगावनजीक एका कारमधून गांजाची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने रात्रभर जागून ९ लाख १५ हजारांचा गांजा ताब्यात घेतला. दिंदृड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी चार आरोपीना अटक केल्याची माहिती आहे.
अप्पर पोलीस अधिक्षक यांना अंबाजोगाईवरून एका वाहनातून गांजा जाणार असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर रात्रभर पोलिसांनी तेलगावजवळ सापळा रचून वाहनाची झाडाझाडती घेतली. यावेळी एका ह्युंदाय कारमध्ये ६० किलो गांजा पोलिसांना आढळून आला. सदर गांज्याची किंमत ९ लाख १५ हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. दरम्यान पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पहाटेच्या सुमारास जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पीएसआय खटावकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांचा यात सहभाग होता.