Advertisement

आमदार पी.एन.पाटील यांचे निधन

प्रजापत्र | Thursday, 23/05/2024
बातमी शेअर करा
कोल्हापूर - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज (गुरुवार ) पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कोल्हापुरवर शोककळा पसरली आहे. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ठेवणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीकडून देण्यात आली आहे.  पार्थिव ११ वाजता सडोली येथे नेण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत.
 
 
 
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारात आमदार पी. एन. पाटील  सक्रिय होते. संपूर्ण मतदार संघ त्यांनी पिंजून काढला होता. मतदानापूर्वी काही दिवस त्यांना थकवा जाणवत होता. यामुळे ते काही दिवस घरी थांबले होते. कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. काही चाचण्याही करण्यात आल्या. ते घरीच उपचार घेत होते. शनिवारी रात्रीही त्यांना घरी सलाईन लावण्यात आली होती. रविवारी सकाळी बाथरूममध्ये चक्कर येऊन ते कोसळले. त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने ऍस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर विशेष विमानाने कोल्हापुरात आले.  कोल्हापूर व मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आमदार पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर प्रकृती गंभीर होती, आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.  रविवारी बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
 
 
आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची बातमी वार्‍यासारखी जिल्ह्यात पसरली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात दाखल होत आहेत. यामुळे रुग्णालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे.

Advertisement

Advertisement