Advertisement

संपादकीय अग्रलेख -शब्दांचा मार शहाण्यांना असतो

प्रजापत्र | Wednesday, 24/04/2024
बातमी शेअर करा

 सहिष्णुता हा सद्गुण असला तरी ती कोणासोबत दाखवावी हे देखील पहिले पाहिजे. एखादा विंचू पिंडीवर बसला आणि त्याला देवपूजा आवडत नसेल तर काय करावे हे संत तुकारामांनी सांगून ठेवले आहे. 'ठकाशी व्हावे महाठक' असे देखील संतचरित्रातूनच शिकायला मिळते. ते विचार आचरणात आणण्याची वेळ पतंजलीने आणली आहे. रामदेवबाबा काय किंवा आचार्य बाळकृष्ण काय, निगरगट्ट योगात माहीर आहेत, त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाने काढलेल्या खरडपट्टीचा फार परिणाम होईल असे नाही, असल्या व्यक्तींना कायद्याचा बडगाच दाखवावा लागतो.
 

 

पतंजली आयुर्वेद या रामदेवबाबा सहसंस्थापक असलेल्या कंपनीने त्यांच्या औषधांबद्दल केलेले दावे आणि इतर वैद्यक शाखांच्या औषधांना कमी लेखण्याचा  केलेला प्रयत्न यावरून सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.मुळात मागच्या काही वर्षात, विशेषतः २०१२ नंतर रामदेवबाबा नावाच्या व्यक्तीचे प्रस्थ देशात इतके वाढले आहे आणि त्य्या व्यक्तीला मिळणारे सरकारी 'संरक्षण ' इतके आहे की आपल्याला कोणी विरोध करील किंवा आपल्यावर काही कारवाई होऊ शकते असला साधा विचार सुद्धा रामदेवबाबा किंवा आचार्य बाळकृष्ण यांच्या मनाला शिवणे शक्य नव्हते. मात्र आयएमए या  डॉक्टरांच्या संघटनेने  सर्वोच्च न्यायालयात धाव 'घेऊन पतंजली ' च्या खोट्या दाव्याच्या संदर्भाने कारवाईची मागणी केली. मात्र त्यानंतर देखील पतंजली किंवा रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांचा ताठा कमी व्हायला तयार नाही. आपण केंद्र सरकारच्या गळ्यातील ताईत आहोत, किंबहुना भाजपच्या कुंडलीत राजयोग आणण्यामागे रामदेवबाबा नावाचा एक ग्रह  होता याची पूर्ण जाणीव पतंजलीच्या आहे. म्हणूनच आज पतंजलीची अवस्था पिंडीवरच्या विंचवासारखी झाली आहे. ते कोणालाच गिनायला तयार नाहीत. अगदी न्यायव्यवस्थेची देखील आपण थट्टा उडवत आहोत याचे त्यांना भान राहिलेले नाही.

 

पतंजलीने स्वतःच्या औषधांच्यासंदर्भाने केलेल्या खोट्या डाव्यांच्या संदर्भाने देशवासीयांची माफी मागावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते . आपण त्याचे पालन करू असे आश्वासन देखील पतंजलीच्या वतीने न्यायालयात देण्यात आले होते. प्रत्यक्षात पतंजलीने काही वर्तमानपत्रांच्या माध्यमातून माफीनामा प्रसिद्ध देखील केला, मात्र त्याचा आकातर पाहता त्यातील शब्द सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने वाचावे लागतील असे निरीक्षण खुद्द सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. ज्या औषधांच्या जाहिराती पूर्ण पांभरून करण्यात आल्या होत्या, जे खोटे दावे मोठ्या आकारात करण्यात आले होते, त्याबद्दलचा माफीनामा मात्र चार ओळीत आणि कुठल्यातरी कोपऱ्यात करण्यात येतो हा प्रकार म्हणजे औपचारिकता पूर्ण करण्याचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी पतंजलीला देशवासीयांची माफी मागण्याचे आदेश दिले होते, त्याचा अर्थ या माफीनाम्याला व्यापक प्रसिद्धी दिली जावी हेच अपेक्षित होते, मात्र रामदेवबाबा आणि पतंजली समूह छक्केपंजे करण्यात माहीर आहे, त्यांनी न्यायालयाच्या मुख्य हेतूलाच हरताळ फसला आहे.

 

अर्थात अगदी न्याय व्यवस्थेची देखील फारशी तमा न बाळगण्याची पतंजलीची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील याच प्रकरणात प्रत्येक तारखेला कोणत्या ना कोणत्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने पतंजली ची खरडपट्टी काढली आहे. मात्र शाब्दिक खरडपट्टीने पतंजलीवर फारसा परिणाम होताना दिसत नाही. हे लोक कोडगे झाले आहेत, यांच्यावर कायद्याचा आसुडच नुसता उगारला नाही ओढला पाहिजे. त्याशिवाय यांच्या बोथट संवेदना जागृत होणार नाहीत. 

Advertisement

Advertisement