Advertisement

संपादकीय अग्रलेख - कोणाला ठेवणार वंचित? 

प्रजापत्र | Thursday, 28/03/2024
बातमी शेअर करा

        राजकारणात प्रत्येकाला आपला राजकीय पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, आपल्या पक्षाचे हित कशात आहे हे पाहण्याचा अधिकार आहे, तसा तो वंचित बहुजन आघाडीला देखील आहेच. पण एकीकडे 'चळवळ लाचार होऊ देणार नाही' म्हणायचे, संविधानाच्या रक्षणासाठी भूमिका घेण्याची वेळ आली आहे असे सांगायचे आणि त्याचवेळी फॅसिस्ट शक्तीला अप्रत्यक्ष फायदा होईल अशी भूमिका घ्यायची हे धोरण वंचित बहुजन आघाडीने घेतले आहे. प्रकाश आंबडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते भलेही याला 'वंचितांचा लढा' म्हणतील पण यातून फायदा होणार आहे तो भाजपचाच, त्यामुळे मग वंचितला नेमके कोणाला 'वंचित' ठेवायचे आहे?
 

 

     वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अखेर आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांचे महाविकास आघाडीशी जुळले नाही, आणि त्यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत वंचित सोबत एमआयएम होता, आता मराठा आरक्षण आंदोलनामुळे राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असतील असे संकेत मिळत आहेत, किमानपक्षी प्रकाश आंबेडकरांनी तसे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आता आंबेडकरी, बहुजन मतांना मराठा मतांची जोड देण्याचे राजकारण प्रकाश आंबेडकर खेळत आहेत.

 

         प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेचे राजकीय परिणाम गंभीर असतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची आवश्यकता नक्कीच नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत देखील अनेक मतदारसंघांमध्ये म्हणजे किमान १९ ठिकाणी 'वंचित' च्या उमेदवारांनी घेतलेली मते लक्षणीय म्हणण्यापेक्षा  निर्णायक देखील ठरली होती आणि त्यातील बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते. वंचितने स्वतः भरपूर मते घेतली तरी त्यांचा एकही उमेदवार लोकसभेला निवडून येऊ शकला नव्हता हे वास्तव आहे. हे आज यासाठी सांगायचे की, महाराष्ट्रात आंबेडकरी मतांना भटके आणि इतर समाजाकडून मतांची मोट बांधायची आणि आपली शक्ती वाढवायची हा प्रयोग राज्याच्या राजकारणात सातत्याने करीत आले आहेत. अगदी भारिप बहुजन महासंघापासून त्यांनी असे प्रयोग प्रत्येकवेळी केले आहेत. मात्र भारिप बहुजन महासंघाचा काही काळाचा अपवाद वगळता ही शक्ती स्वतःचे उमेदवार निवडून येण्यापेक्षा कोणाला तरी पाडण्यासाठीच खर्ची झाली हे देखील कटू असले तरी वास्तव आहे.
   

 

   आज देशातील राजकीय परिस्थिती गंभीर वळणावर आहे. देश फॅसिस्ट शक्तीच्या अधीन होऊ लागल्याचे चित्र आहे. इतर कोणा पेक्षाही स्वतः प्रकाश आंबेडकरांनीच हे अनेकदा जाहीरपणे सांगितले देखील आहे. देशासाठी ही निवडणूक सर्वार्थाने महत्वाची असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर वारंवार सांगत आले आहेत. भाजपला रोखणे हा वंचितचा अजेंडा असल्याचे देखील आंबेडकर सांगतात, त्यामुळे खरेतर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवेल असे अपेक्षित होते. मात्र वंचितच्या महाविकास आघाडी सोबतच्या बैठका सुरुवातीपासूनच यशस्वी होण्यापेक्षा फिस्कटतील कशा हेच पाहिले गेले. याचा सारा दोष अर्थातच केवळ प्रकाश आंबेडकर किंवा वंचितला देता येणार  नाही. लोकशाहीमध्ये स्वतःच्या पक्षाचे हित पाहण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, तो वंचितला देखील निश्चितच आहे. पण हे हित पाहताना ज्या भूमिका आपण सांगत आलो, त्या भूमिकांचे काय? 
     वंचित बहुजन आघाडी आणि आता प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे त्याला मनोज जरांगे यांची जोड मिळाली तर ही शक्ती निवडणुकीत अनेकांना 'धडा' शिकवू शकेल हे मान्य पण हा धक्का कोणाला बसणार आहे? मागच्या काही निवडणुकांचा अनुभव पाहता ही 'शक्ती' कोणाला लागणार आणि याचा फायदा कोणत्या 'महाशक्तीला' होणार हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच वंचितला नेमके कोणाला सत्तेपासून वंचित ठेवायचे आहे आणि कोणाचे हित साधायचे आहे?

 

Advertisement

Advertisement