Advertisement

व्यापार्‍याची ३२ लाखाची फसवणूक

प्रजापत्र | Thursday, 07/03/2024
बातमी शेअर करा

माजलगाव- माजलगाव येथील आडत दुकानदार यांची लातुर येथील माहेश्वर पल्सेस दाल मिल या ठिकाणी ३२ लाख ७९ हजार ७६५ रूपयांची तुर घेतली. यानंतर संध्याकाळी आरटीजीएसने पैसे देतो असे सांगितले, मात्र, आजपर्यंत सदरील व्यापार्‍याने रक्कम न दिल्याने फसवणूक झाल्याचे समजताच माजलगाव येथील व्यापार्‍यांनी गुन्हा दाखल केला आहे.

विष्णुदास भिकुलाल भुतडा (आडत दुकानदार) यांचे शुभम ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. याठिकाणी खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार होतात. लातुर येथुन बालाजी कोयल नामक व्यक्तीने तुमच्याकडे तुर, चना माल विक्रीसाठी आहे का? या संदर्भात विचारणा करत माल खरेदीचा व्यवहार करू असे फोनवर सांगितले. सर्व व्यवहार बोलणे झाल्यानंतर माजलगाव येथील मराठवाडा ट्रान्सपोर्ट येथून ट्रक पाठवून त्यामध्ये १२१ क्विंटल माल ट्रक (क्र.एम.एच.४३ ई.२९५२) देवून पाठवून दिला. सदरील माल माहेश्वरी पल्सेस दाल मिल येथे दि.१ मार्च रोजी खाली करण्यात आला.

सदरील मालाची क्रॉसिंग झाल्यानंतर बालाजी कोयल यांना चना व तुर मालाची रक्कम ३५ लाख ७९ हजार ७६५ रूपये आरटीजीएस करून संध्याकाळपर्यत पैसे देतो असे सांगितले होते. मात्र, संध्याकाळी किंवा वेळोवेळी सदरील व्यापार्‍यांना फोन करूनही पैसे दिले नाहीत.

दरम्यान अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माजलगाव शहर पोलीस ठाण्यात बालाजी कोयल, योगेश हांडे पाटील व एका व्यक्तीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. या पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत.
 

Advertisement

Advertisement