बीड : बीड तालुक्यातील केतुरा येथील आत्महत्या प्रकरणातील खरा प्रकार समोर आल्या नंतरही या प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसंग्रामच्या अंगलट आला. विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते ' त्या ' कुटुंबाचे सांत्वन करायला गेले खरे, पण त्याठिकाणी गावकऱ्यांनी 'त्या ' बनावट चिट्ठीवरून नेत्यांनाच घेरले आणि भेटीसाठी आलेल्या नेत्यांना चक्क काढता पाय घ्यावा लागला.
बीड तालुक्यातील केतुरा येथील एका विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर सदर आत्महत्या मराठा आरक्षणासाठी असल्याचे भासवणारी एक सुसाईड नोट व्हायरल करण्यात आली. भाजप , शिवसंग्राम आणि अनेक संघटनांनी सदर प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न केला. केतुरा येथे पुढाऱ्यांची रीघ लागली. मात्र ज्या चिट्ठीवरून हे सारे सुरु झाले, ती चिट्ठीच बनावट असल्याचे, मयत विवेकची नसल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाला हवा देऊ पाहणारी चांगलीच गोची झाली.
त्यानंतरही विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि आ. विनायक मेटे सोमवारी रहाडे कुटुंबाचे सांत्वन करायला गेले होते. त्याठिकाणी गावकऱ्यांनी मात्र 'ती बनावट चिट्ठी कोणी लिहिली याचा तातडीने शोध लागला पाहिजे, तसा शोध लावायला पोलिसांना सांगा. याप्रकरणात विनाकारण समाज आणि गावाची बदनामी होत आहे ' अशी भूमिका घेत नेत्यांवर प्रश्नांनाची सरबत्ती केली . गावकऱ्यांच्या प्रश्नांवर काही बोलण्याऐवजी प्रवीण दरेकर , आ. विनायक मेटे यांनी तेथून काढता पाय घेत उठून जाणे पसंत केले.