बीड : केज तालुक्यातील नरेगा घोटाळ्याची झाडाझडती सुरु असतानाच जिल्ह्यातील अशा घोटाळ्यांची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. केज तालुक्यातील अनेक गावांमधून तक्रारी वाढत असतानाच आता गेवराई तालुक्यातील तक्रारी देखील प्रशासनाच्या रडारवर आहेत. या तक्रारींची चौकशी सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला कृषी अहवालाची प्रतीक्षा आहे. तो अहवाल आल्यानंतर गेवराईमध्ये देखील मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या काही महिन्यापासून विविध पंचायत समित्यांमधील नरेगा घोटाळे चर्चेत आहेत. सध्या केज तालुक्यातील १२० गावांमध्ये नरेगा अंतर्गत झालेल्या कामांची तपासणी सुरु आहे. पथकाने गावात जाऊन चौकशी करावी असे निर्देश आहेत. मात्र हि चौकशी सुरु झाल्यानंतर आता या १२० पेक्षा वेगळ्या गावांमधून देखील आपल्या गावात चुकीचे किंवा बोगस काम झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे येत असल्याची माहिती नरेगा विभागाचे अधिकारी गिरी यांनी सांगितले. त्या सर्वच तक्रारींची देखील चौकशी होणार आहे.
केज सोबतच आता प्रश्नाच्या रडारवर गेवराई तालुका आहे. गेवराई तालुक्यात नरेगा अंतर्गत झालेली मोठ्याप्रमाणावर कामे कृषीशी संबंधित आहेत . जिल्हा परिषदेने अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या यंत्रणेमार्फत केलेल्या कामांची यादी मागविली आहे. गेवराई तालुक्यात एकाच कामाचे देयक दोन यंत्रणांकडून उचलल्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता कृषी विभागाने यादी दिल्यानंतर जिल्हा परिषद गेवराई तालुक्यातील कामांची चौकशी करणार आहे.
प्रजापत्र | Saturday, 03/10/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा