Advertisement

राज्यात दैनंदिन मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना  बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर एकूण सक्रिय रुग्णसंख्याही घटल्याने राज्याला आज दिलासा मिळाला आहे. मात्र, असे असले तरी, आज मृत्यूची संख्या वाढली आहे. तसेच, दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट झाल्याने दुसऱ्या बाजूने चिंतेत वाढही झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ३९१ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ५८६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ४१० इतकी होती. तर, आज ८० रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ६७ इतकी होती.
आज राज्यात झालेल्या ८० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख २० हजार ३१० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के इतके झाले आहे.

 

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित घट

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ९१९ इतकी आहे. काल ही संख्या ४८ हजार ४५१ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ६९९ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ७ हजार ३९६ आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ३ हजार ८१३ वर गेला आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ६ हजार २३० अशी आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार २९५ अशी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ५१३ इतकी किंचित वाढली आहे.
 

Advertisement

Advertisement