Advertisement

लॉकडाऊनबाबत व्यापारी संभ्रमात,प्रशासनाच्या पातळीवर देखील गोंधळ

प्रजापत्र | Saturday, 22/08/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यातील ६ शहरांमध्ये लावण्यात आलेले लॉकडाऊन उठविण्यात आले आहे की नाही याबाबत अजूनही व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. प्रशासनाच्या पातळीवर देखील वेगवेगळे आदेश असल्याने गोंधळाची स्थिती असल्याचे आज पाहायला मिळत आहे. मात्र जिल्हा प्रशासन यावर अधिकृतरीत्या काही बोलायला तयार नाही. 
बीड जिल्ह्यातील ६ शहरांमध्ये १२ ऑगस्ट रोजी १० दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते, ते २१ ऑगस्ट रोजी संपले. त्यानंतर लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे अधिकृत आदेश प्रशासनाने काढलेले नाहीत. तर १९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून या ६ शहरांमध्ये मोजके व्यवसाय उघडायला परवानगी दिली होती, आणि इतर व्यवसायांबाबत नंतर आदेश काढण्यात येतील असे म्हटले होते. पण हे आदेश लॉकडाउनच्या काळापुरते आहेत की कायमस्वरूपी हे देखील प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांना ६ शहरे सरसकट उघडणार नसल्याचे सांगितले आहे. पण याबाबाबत आदेश काहीच नाहीत. बीडच्या तहसीलदारांनी २१ रोजी रात्री काढलेल्या आदेशात लॉकडाऊन संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. तर ज्यांनी आज दुकाने उघडली त्यांच्यावर नगर पालिका कारवाई करीत आहे. यामुळे व्यापारी आणि सामान्य जनता संभ्रमात आहे. पण प्रशासन काहीच बोलायला तयार नाही . अगोदरच सामान्य जनता परेशान  असताना जिल्हा प्रशासन मात्र गोंधळ आणखीच वाढवीत आहे. 

व्यापारी हवालदिल 
हा लॉकडाऊन जाहीर करताना पालकमंत्र्यांनी हा लॉकडाऊन शेवटचा ठराव अशी अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र आता प्रशासन आज देखील दुकाने उघडू देत नसल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. जगायचे कसे आणि  दुकानावरील कामगारांचे काय असा प्रश्न देखील व्यापारी विचारीत आहेत. 

Advertisement

Advertisement