Advertisement

रोटरीमुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्वच बदलते

प्रजापत्र | Tuesday, 14/07/2020
बातमी शेअर करा

रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती तुमच्यात मोठ्या प्रमाणावर बदल घडवते. रोटरीमध्ये येण्यापूर्वीचा मी आणि रोटरीचे काम सुरू केल्यानंतरचा मी यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडलेला आहे. रोटरीमुळे तुमचे एकंदर व्यक्तिमत्व बदलून जाते. या शब्दात रोटरीचे नूतन प्रांतपाल(गव्हर्नर) हरीश मोटवानी यांनी प्रजापत्रशी संवाद साधला

या मुलाखतीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 
https://youtu.be/6BeCBtKLqRo

प्रश्‍न-रोटरी म्हणजे मोठ्या लोकांची संस्था अशी प्रतिमा आहे, काही ठिकाणी रोटरीच्या माध्यमातून उभी राहिलेली कामेही दिसतात. रोटरी नेमकी काय आहे?
हरीश मोटवानी-
रोटरी ही एक सामाजिक काम करणारी संघटना आहे. ती एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करते. 1905 साली चार मित्रांनी शिकागो येथे सुरू केलेली ही संघटना आज 220 देशांमध्ये पसरलेली आहे. तब्बल 18 लाख सदस्य या संघटनेचे आहेत. प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागाच्या, त्या त्या समाजाच्या म्हणून ज्या काही गरजा असतात त्या भागविण्याचे काम करण्याचा प्रयत्न रोटरीच्या माध्यमातून केला जातो आणि विशेष म्हणजे हे सर्व प्रकल्प सदस्यांच्या खिशातून राबविले जातात.
प्रश्‍न-रोटरी म्हणजे विकतचा मोठेपणा घेण्याचा प्रकार असल्याचं उपहासानं बोललं जातं?
हरीश मोटवानी-
लोक काय बोलतात हा वेगळा विषय पण आम्ही सर्व सदस्य एकत्र येतो ते मैत्रीच्या भावनेतून.मैत्री आणि आनंद हा रोटरीचा पाया आहे. आम्ही रोटरीकडे एक कुटुंब म्हणून पाहतो म्हणूनच जगात कोठेही एखादा रोटरीयन अडचणीत आला तर त्याच्या मदतीसाठी दुसरा रोटरीयन धावून येते.दॅट इज द ब्यूटी ऑफ रोटरी. आम्ही जेंव्हा एकत्र येतो तो फेलोशिपचा प्रकार असतो. त्यातून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो आणि अनेक सामाजिक प्रकल्प यातूनच राबविले जातात.
प्रश्‍न-तुमचा रोटरीशी संबंध कसा आला?
हरीश मोटवानी-
माझे मेडीकलचे दुकान आहे. त्या दुकानसमोर एकदा पल्स पोलिओचे बूथ लागलेले होते आणि पोलिओची लस थंड वातावरणात ठेवावी लागते त्यामुळे ते लोक आमच्या मेडिकलमध्ये ती लस ठेवत होते त्यावेळी त्या लोकांची ऊर्जा, एखादं चांगलं काम करण्यासाठीची धडपड यातून मला प्रेरणा मिळाली आणि मी रोटरीकडे ओढला गेलो. रोटरीच्या बीड मिडटाऊनचा मी सदस्य झालो.
प्रश्‍न-ही कधीची घटना आहे?
हरीश मोटवानी-
हा प्रसंग 1997-98 चा आहे. या प्रसंगासोबतच त्यावेळी सुरज लाहोटी यांनी एक चांगला वैद्यकीय प्रकल्प राबविला होता. तसेच माझे मोठे बंधू राम मोटवानी हे देखील रोटरी मध्ये होते. त्यांच्यामुळेही मला रोटरीमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली.
प्रश्‍न-97-98 ते 2020 या कालावधीत तुम्हाला काय काय करता आलं? काय अनुभवता आलं?
हरीश मोटवानी-
जसं की आपण सुरूवातीलाच बोललो रोटरी ही एक जागतिक संघटना आहे. मात्र त्याचवेळी ती स्थानिक प्रश्‍नांचाही विचार करते. स्थानिक प्रश्‍नांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून पैसा मागविता येतो. त्यातूनच 20 वर्षापूर्वी आम्ही बीडमध्ये कमी किमतीतली 32 घरं बांधून दिली. या 22-23 वर्षांच्या काळात जे पाईल्सवरचे शिबीर आम्ही घेतले त्याची जिल्ह्याच्या बाहेरही चर्चा आहे. एचआयव्ही ग्रस्त महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप असेल किंवा सध्या सुरू असलेले अन्नछत्राचे प्रकल्प असतील अशा वेगवेगळ्या माध्यमातून मला काम करता आले.
प्रश्‍न-रोटरीचे जे सदस्य असतात ते साधारणत: उद्योजक, व्यापारी असे व्यस्त दिनक्रमातले लोक असतात मग त्यांना अशा सामाजिक कामासाठी वेळ द्यायला कसं जमतं?
हरीश मोटवानी-
खरं सांगायचं तर ज्याच्याकडे वेळ नाही तोच काहीतरी काम करू शकतो. रिकामटेकडे लोक काय काम करणार. रोटरीमध्ये येतानाच समाजासाठी काहीतरी करायचं आहे ही भावना असते. तसेच आमच्याकडे सदस्यांमध्ये देखील विविधता असते. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपल्या क्लबमध्ये असतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ज्या क्षेत्रातील लोक नसतात त्या क्षेत्रातील लोकांना निमंत्रण देऊन बोलावतो. इथे अर्ज करून कोणाला सदस्य होता येत नाही तर निमंत्रणावरूनच सदस्यत्व दिलं जातं.
प्रश्‍न-रोटरीचा सदस्य व्हायला व्यक्ती भरपूर पैसेवालाच लागतो का?
हरीश मोटवानी-
तसंही काही नाही. पण पैसा महत्वाचा असतोच. आपण आपलं भागवून समाजाला काही देवू शकतो का याचा विचार करणारे लोक रोटरीत येतात त्यातूनच प्रकल्प राबविले जातात. पण केवळ पैसेवालाच लागतो असं नाही.
प्रश्‍न-मग रोटरीचं नेमकं तत्वच काय आहे?
हरीश मोटवानी-
मैत्री हेच रोटरीचं प्रमुख तत्व आहे. पाया आहे म्हणावं हवं तर. त्यासोबतच जागतिक शांतता हा रोटरीचा महत्वाचा विषय आहे. रोटरीच्या माध्यमातून सात वेगवेगळ्या केंद्रांमधून दरवर्षी 100 स्कॉलर प्रशिक्षित केले जातात आणि वेगवेगळ्या देशांमध्ये ते शांतीदूत म्हणून काम करतात. आपला जो प्रांत आहे 3132 नंबरचा त्यातूनही आपण दोन सदस्य पाठविले आहेत. यासोबतच पाणी, साक्षरता, शिक्षण विशेषत: आता डिजिटल शिक्षण हॅपी स्कूल यावर रोटरी काम करतेय. माता आणि बालआरोग्य, आर्थिक विकास यावरही रोटरीमध्ये काम होते.
प्रश्‍न-रोटरीची चतु:सूत्री नेमकी काय असते?
हरीश मोटवानी-
रोटरी ज्या-ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे रोटरीची चतु:सूत्री. कोणत्याही गोष्टीकडे पाहताना हे योग्य आहे का? हे सत्य आहे का? हे सर्वांसाठी उपयोगी आहे का? आणि यातून मैत्री निर्माण होईल का? व्यक्ती आनंदी राहील का? याचा विचार करणे हीच रोटरीची चतु:सूत्री आहे.
प्रश्‍न-रोटरीने हरीश मोटवानी या  व्यक्तीमध्ये काय बदल घडवून आणले?
हरीश मोटवानी-
मुळात रोटरी केवळ सामाजिक प्रकल्प उभारते असे नाही तर व्यक्तिमत्वाची उभारणी करण्याचे काम देखील करते. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी सुरूवातीला स्टेजवर जाऊन बोलू सुध्दा शकत नव्हतो. माझे पाय थरथरायचे. पण रोटरीने माझ्यामध्ये नेतृत्वगुण निर्माण केले. आज मी अनेकांशी संवाद साधू शकतो, संघटन वाढवू शकतो ही रोटरीची देणगी आहे. माझ्या व्यवसायात सुध्दा जे प्रशासन वेगळ्या पध्दतीने राबवायला शिकलो ते रोटरीमुळे. प्रत्येकाशी शांततेने, संयमाने संवाद साधायची कला रोटरीमुळेच मिळाली.
प्रश्‍न-रोटरीचा प्रांतपाल होणं सोपी गोष्ट नाही. बीड जिल्ह्यातर ही संधी पहिल्यांदाच मिळत आहे. नेमका हा प्रवास कसा झाला?
हरीश मोटवानी-
मी 1997-98 ला रोटरीचा सदस्य झालो. त्यावेळी सोलापूरचे डॉ.राजीव प्रधान हे तत्कालीन पुणे प्रांताचे प्रांतपाल होतो. त्यावेळी बीड जिल्हा रोटरीच्या पुणे प्रांतात होता. त्यांच्याकडे पाहूनच एक दिवस आपल्याला प्रांतपाल व्हायचयं असं मनात वाटत होतं. त्यानंतर तीन वर्षांनी मला प्रेसिडेंट होता आलं. त्यानंतर पुणे प्रांतावर काम करण्याची संधी मिळाली. डायरेक्टर, सचिव अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करता आलं. या सगळ्या काळात वाय जनार्दनराव यांच्या माध्यमातून खरी प्रेरणा मिळाली. त्यांच मार्गदर्शन मिळत गेलं. हे सर्व करत असताना सर्वांशी मैत्री वाढत गेली. प्रत्येक क्लबशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळेच गव्हर्नर म्हणून निवडून आलो.
प्रश्‍न-आपल्या प्रांतात रोटरीचे  नेमके जाळे किती आहे?
हरीश मोटवानी
-हा जो आपला प्रांत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह सोलापूर, सातारा आणि अहमदनगरचा संबंध आहे. या आठ जिल्ह्यात सध्या 85क्लब आहेत, साडेतीन हजार सदस्य आहेत. माझ्या कार्यकाळात मला सदस्यांची संख्या 1 हजारने वाढवायची आहे तर क्लब 100 पेक्षा जास्त करायचे आहेत. अर्थात हे सर्व सांघीक काम आहे. हे करताना सामुहिक विकास, रोटरीच्या सामाजिक प्रतिमेमध्ये बदल करणे हे देखील घडवायचे आहे.
प्रश्‍न-आपला कार्यकाळ किती दिवसाचा असतो?
हरीश मोटवानी-
रोटरी मध्ये प्रत्येक पद एक वर्षाचे असते. 1 जुलैला माझा कार्यकाळ सुरू झाला असून तो आता 30 जून पर्यंत आहे.
प्रश्‍न-आपल्या पदाचा बीड जिल्ह्याला  काय फायदा होईल?
हरीश मोटवानी-
मी प्रांतपाल म्हणून विचार करताना सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये काय करता येईल याचे नियोजन करतोय. तरीही बीड जिल्ह्यासंदर्भात बोलायचे तर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रकल्प कमी राबविले आहेत. त्यावर भर द्यायचा आहे. यूथ एक्सचेंज नावाचा रोटरीचा एक कार्यक्रम आहे. त्या माध्यमातून एका देशातील युवक दुसर्‍या देशात जाऊन काम करतात. त्यात बीड जिल्ह्याचा सहभाग वाढवायचा आहे. आपल्या प्रांतातील किमान 100 गावे अंधमुक्त करायची आहेत. त्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत त्याची आणि रोटरीची सांगड घालून काम करायचे आहे. सेंद्रिय शेती, किचनगार्डन, हृदयशस्त्रक्रिया, युवकांमधील कौशल्यविकास तब्बल 25 हजार विद्यार्थ्यांची दंतरोग तपासणी, शस्त्रक्रिया शिबीर यासोबतच यूथ लिडरशिप अ‍ॅवॉर्डस आणि एकंदरच व्यक्तिमत्व विकासावर काम करणार आहोत.
प्रश्‍न-यातील अनेक योजना शासनदेखील राबविते मग रोटरीने ते करण्याची काय आवश्यकता आहे?
हरीश मोटवानी-
यातील अनेक प्रकल्प शासकीय योजनांमध्ये आहेत हे मान्य आहे पण शासकीय योजनांसोबत सांगड घालून रोटरीने गाव पातळीवर जाऊन काम केले तर काय होवू शकते हे मी आपल्याला वर्षभरानंतर दाखवून देईल. आपल्याला सरकार सोबत हातात हात घालून काम करायचे आहेत. काही गावं दत्तक घ्यायचे आहेत. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण यावर काम करायचे आहे.
प्रश्‍न-एकीकडे मैत्री हा रोटरीचा पाया म्हणता मात्र त्याचवेळी एका गावात अनेक क्लब झाल्यानंतर वाद वाढतात याकडे कसे पाहता?
हरीश मोटवानी-
खरं तर हे एक आव्हान आहेच. पण हे वाद नसतात तर स्पर्धा आहे आणि जगण्याच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये अशी स्पर्धा असतेच. प्रत्येक क्लबला आपले काम अधिक चांगले व्हावे असे वाटते आणि त्यातून स्पर्धा वाढते. पण जेंव्हा केंव्हा एखाद्या सामाजिक कामाचा विषय येतो त्यावेळी आम्ही सर्व एकत्र असतो. आमच्यात वाद नसतात.
प्रश्‍न-आपण रोटरीयन आणि  सामान्यांना काय संदेश द्याल?
हरीश मोटवानी-
आपल्याला समाजात प्रत्येक विषयावर जागृती वाढविण्याची गरज आहे. आता कोविडचेच उदाहरण घ्यायचे म्हटले तर गर्दी करू नये, मास्क वापरावेत याबद्दल देखील पुरेशी जागृती समाजात असताना दिसत नाही. अशा प्रकारची जागृती निर्माण झाली पाहिजे. त्यासोबतच वीज, पाणी, स्थानिक प्रश्‍न यावर रोटरीयन्सनी आवाज उठविला पाहिजे आणि आपले सामाजिक ऋण प्रत्येकाने चुकविले पाहिजे.

 

Advertisement

Advertisement