धाराशिव:धाराशिव तालुक्यातील येडशी गावात मध्यरात्री काळाने अचानक घाला घातला. ‘करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर’ या दुकानाला लागलेल्या भीषण आगीने लगतच्या घरालाही आपल्या विळख्यात घेतले. या अग्नितांडवात एकाच घरातील तीन पिढ्यांचा अक्षरशः होरपळून जागीच दुर्दैवी अंत झाला. सोमवारी पहाटे घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींसह आजी-आजोबा आणि आई-वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मध्यरात्री उठल्या आगीच्या ज्वाला
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास करंडे यांच्या किराणा दुकानाला अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि लगतच असलेल्या घराला सर्व बाजूंनी वेढले. गाढ झोपेत असलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
मात्र, आगीची भीषणता इतकी प्रचंड होती की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.
मृत व्यक्तींची नावे:या अग्निप्रलयात एकाच कुटुंबातील खालील सहा जणांचा मृत्यू झाला आहे:१. उत्तम त्रिंबक करंडे (वय ७५) — आजोबा२. चंद्रकला उत्तम करंडे (वय ७०) — आजी३. गोविंद उत्तम करंडे (वय ४७) — वडील४. ज्योती गोविंद करंडे (वय ४२) — आई५. गायत्री गोविंद करंडे (वय १६) — मुलगी६. सिद्धी गोविंद करंडे (वय १५) — मुलगी
तीन पिढ्या एकाच क्षणात संपल्या.
एकाच रात्रीत, एकाच क्षणात एका सुखी संसाराची राखरांगोळी झाली. करंडे कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांपासून ते शिक्षण घेणाऱ्या दोन कोवळ्या मुलींपर्यंत सर्वांचाच अशा प्रकारे करुण अंत झाल्याचे पाहून मदतकार्यासाठी धावून आलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. आगीचे नेमके कारण काय होते, शॉर्टसर्किटमुळे हा भडका उडाला की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे येडशी गावातील बाजारपेठेत शुकशुकाट पसरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

