बार्शी : एका विवाहितेची विवाहबाह्य संबंधातून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बार्शी शहर एका विवाहितेच्या आत्महत्येने हादरले. २५ वर्षीय अंकिता उकिरडे या विवाहितेने तिच्या १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजले आणि नंतर घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (७ नोव्हेंबर) घडली. बाळाची प्रकृती गंभीर आहे.
अंकिता वैभव उकिरडे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, १४ महिन्यांचा मुलगा अन्वीक वैभव उकिरडे याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही घटना शुक्रवार सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. अंकिता हिचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे यांच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता ही घरात चिमुकल्यासह एकटीच होती.नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या महिलेला घरात कोणी दिसले नाही. तिने खिडकीतून पाहिले असता, अंकिता ही सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली, तर लहानगा अन्वीक अत्यवस्थ अवस्थेत आढळला.
अंकिताचा जागेवरच मृत्यु
घरकाम करणाऱ्या महिलेने आरडाओरड करत शेजारी राहणाऱ्या लोकांना आणि नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. आवाज ऐकून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची बार्शी शहर पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. अंकिताने आत्महत्या का केली, याबद्दल आता पोलीस तपास करत आहेत.

