बीड-येथील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून एक कोटी रूपयांची लाच मागितली होती.त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले होते.लाच स्विकारताच व्यापाऱ्याला बेड्या ठोकल्या. तर लाच मागणारा आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि प्रोत्साहन देणारा हवालदार हा फरार झाला होता.जिजाऊच्या प्रकरणात तपासात सहकार्य करण्यासाठी एवढ्या प्रमाणावर लाच मागितल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.सदरच्या लाचेत कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा वाटा ठरलेला होता याच्या चर्चाही मोठ्या चवीने आता बीडमध्ये सुरु आहेत.दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याचे पाळेमुळे शोधणार का ?हे ही पाहणे महत्वाचे ठरेल.
पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेत मांडवलीचा खेळच मांडला होता.वरिष्ठांच्या सहकार्याने त्यांची कोटी-कोटींची उड्डाणे सुरु असल्याच्या चर्चा ही दबक्या आवाजात सुरु आहेत.मल्टीस्टेट प्रकरणात ठेवीदारांचा जीव एकीकडे टांगणीला लागलेला असताना आर्थिक गुन्हे शाखा मात्र मोहमाय जमविण्यात व्यस्त होती.ज्या मल्टीस्टेट अडचणीत आल्या आहेत त्यांच्याकडून खाडे यांनी मोठे पैसे उकळल्याचे आता सांगितले जात आहे. अनेकांना कायदेशीर कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी खाडे यांनी रस्ते दाखविण्याचे काम केले होते.खाडेबाबत जिल्ह्यात मोठ्या तक्रारी अलीकडच्या काळात वाढल्या होत्या.त्यातच काल लाचेचा गुन्हा ही दाखल करण्यात आला.मात्र एवढी मोठी लाचेची मागणी खाडे यांनी स्वतःसाठी केली होती की,यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ही वाटा ठरलेला होता हे अद्याप समोर आलेले नाही.जिजाऊ प्रकरणात एक पोलीस निरीक्षक थेट १ कोटीच्या लाचेची मागणी करतो मात्र याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होत नाही,बरं एवढी मोठी लाच खाडे स्वतः साठी घेत असताना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी करतात काय हा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थितीत होत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने किती आरोपींना पकडले ?
जिल्ह्यात मल्टीस्टेटचे लोण प्रचंड मोठे आहे.हजारो ठेवीदार आज अडचणीत आलेले आहेत.अनेकांनी जिल्ह्यातून पळ काढला.यातील काही जणांना आर्थिक गुन्हे शाखेनेच वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला.मांडवलीत बादशहा ठरू लागलेल्या खाडे यांनी अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न केला असून या शाखेने किती आरोपीना पकडले आहे हाही संशोधनाचा विषय आहे.आपल्याकडे आलेले प्रकरण हे फक्त पैसे उकळण्यासाठीचे साधन असून यातून मिळणाऱ्या वाटेत अनेकांना आपापला हिस्सा मिळत असायचा अश्या देखील चर्चा आहेत.
आज होणार घराची झाडाझडती
पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर खाडे फरार झाल्याचे कळते.त्यांचे घर बंद असल्याने काल झाडाझडती घेण्यात आली नव्हती.मात्र आज न्यायालयातातून घराच्या झाडाझडतीसाठी परवानगी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे थोड्यावेळातच खाडे यांच्या घरात किती रुपयांचे घबाड मिळाले हे देखील समोर येणार आहे.