Advertisement

संपादकीय अग्रलेख - काठीचे कोल्हे !

प्रजापत्र | Thursday, 09/05/2024
बातमी शेअर करा

ज्यावेळी बोलण्यासारखे काही नसते त्यावेळी समोरचा जे बोललाच नाही त्याला मोडून तोडून समोर मांडावे लागते. ग्रामीण भागात याला काठीचे कोल्हे करणे म्हणतात. सध्या भाजपाचा सारा प्रचार असाच काठीचे कोल्हे करणारा आहे आणि देशाच्या पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीकडून ते सातत्याने होत आहे.

 

 

मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा देशावरचा हल्ला होता.याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाही. किंबहुना कोणीही तसे म्हणणारही नाही. हा हल्ला परतावून लावताना आणि देशाचे संरक्षण करताना अनेकांना शहीद व्हावे लागले हे देखील वास्तव आहे. त्या शहीदांचा प्रत्येकाने सन्मानच केलेला आहे. मात्र हे सारे होत असताना हेमंत करकरे यांच्या संदर्भाने माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ यांनीच एका पुस्तकातून एक वेगळी माहिती समोर आणली.‘हु क्लिड करकरे’ हे काही मागच्या चार दोन दिवसात समोर आलेले पुस्तक नाही. मागच्या काळात या पुस्तकावर सातत्याने चर्चाही झाल्या. राज्याच्या अथवा केंद्राच्या सरकारने अद्याप तरी या पुस्तकावर बंदी देखील घातलेली नाही किंवा या पुस्तकातील मजकुराबद्दल काही आक्षेप घेतले गेलेले नाहीत. मग याच पुस्तकातील काही संदर्भ घेऊन जर विजय वडेट्टेवारांनी एखादे विधान केले तर लगेच संपूर्ण काँग्रेस पक्षाला अतिरेक्यांच्या पंक्तीत बसवण्याचा प्रकार हा खर्‍या अर्थाने काठीचे कोल्हे करण्याचाच आहे. विशेष म्हणजे हे सारे करणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द देशाचे पंतप्रधान आहेत.

 

अर्थात कधी सैन्य दल तर कधी पोलिस यांची ढाल करत खोटा प्रचार करण्यात भाजपाला सातत्याने रस राहीलेला आहे. किंबहुना सैन्यदलावरून राजकारण करण्याचा पायंडाच पाडला तो मुळी भाजपाने. मागच्या निवडणुकीतही मनमोहन सिंह आणि देशाच्या तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या संदर्भाने संशयात्मक प्रचार भाजपाने केला होताच. ज्यावेळी भाजपाला विकासाच्या प्रश्‍नावर बोलता येत नाही. त्यावेळी मग सैन्य,दहशतवाद,सिमांचे रक्षण अशा काही विषयावरून भावनिक प्रचार केला जातो आणि मग सैन्य दलाच्या अथवा पोलिस दलाच्या कारवाईबाबत प्रश्‍न विचारणारांना थेट देशद्रोही ठरविले जाते. भाजपा आणि त्यांचे ट्रोल बहाद्दर हे सर्व करण्यात सातत्याने आघाडीवर असतात. देशाला आता हे नवीन राहीलेले नाही. त्यामुळे विजय वडेट्टेवारांच्या विधानांचा आधार घेत मागच्या चार दिवसांपासून देशाचे पंतप्रधान जो राग आलापत आहेत तो खोटा प्रचार कसा असतो याचे उत्तम उदाहरण आहे. आता एकदा मोदींनीच तसा प्रचार सुरू केल्यानंतर त्यांच्या कनिष्ठांना त्यापेक्षा मोठ्या आवाजात हे मुद्दे मांडावेच लागतील. एकनाथ शिंदे तेच करत आहेत. करकरेंना लागलेली गोळी नेमकी कोणाची होती? हा प्रश्‍न आज पहिल्यांदा उपस्थित झालेला नाही. एस.एम.मुश्रीफांनी आपल्या पुस्तकातून हा प्रश्‍न उपस्थित केला त्यालाही आता अनेक वर्षे झाली आहेत. तपास यंत्रणांनी अजूनही त्या प्रश्‍नाचे उत्तर दिलेले नाही. एकनाथ शिंदे हे एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना शहीदांच्या सन्मानाची खरोखरच इतकी काळजी आहे तर आतापर्यंत तपास यंत्रणाकडून या प्रश्‍नाचे उत्तर मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे होते. मात्र तसे काही करण्या ऐवजी ‘काँग्रेस का हाथ पाकीस्तान के साथ’ असं काही टाळ्या मिळविणारे वक्तव्य करण्यात ते धन्यता मानत आहेत. दहशतवाद रोखण्यासाठी आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी प्रयत्न केलेले आहेतच.त्यात कमी अधिकपणा झाला असेल पण म्हणून एखाद्या राजकीय पक्षालाच थेट अतिरेक्यांच्या पंक्तीला बसविण्याचा अगोचरपणा भाजपाशिवाय दुसरे कोणी करत नाही.

Advertisement

Advertisement