Advertisement

अंबाजोगाईच्या 'स्वाराती' रुग्णालयात राडा

प्रजापत्र | Monday, 22/04/2024
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - गाडीची पार्किंग करण्याच्या क्षुल्लक कारणावरून शहरातील पाटील चौकात दोन गटात वाद झाला. यातील जखमी तरुण उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात गेला असता तिथे अपघात विभागात त्याच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी १६ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व आरोपी फरार झाले आहेत.  

 

 

 सविस्तर माहिती अशी कि,अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर रविवारी (दि.२१) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली. अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. अपघात विभागात बहुतांशी वेळेस अत्यवस्थ रुग्ण असतात. रविवारी देखील अनेक रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू होते. त्याच वेळी ही घटना झाली. हाणामारी करणाऱ्या तरुणांना अपघात विभाग सारख्या संवेदनशील ठिकाणी गोंधळ घालू नये याचेही भान राहिले नाही. चक्क अपघात विभागात घुसून एकमेकांवर खुर्च्छा फेकत त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. प्रचंड दहशतीखाली रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचारी जीव मुठीत धरून हा धुडगूस पाहत होते. 

 

 

दरम्यान, या दोन गटातील वाद शहरातील पाटील चौकातून सुरु झाला होता. फेरोज अब्दुल सत्तर कुरेशी यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या अर्शान कुरेशी याचे पाटील चौकात साकेब पठाण आणि इतर सहा जणांसोबत गाडी पार्क करण्यावरून वाद झाला. या वादातून साकेबने एक किलो लोखंडी वजनमाप गमच्यामध्ये बांधून अर्शानला मारहाण केली. त्यामुळे फेरोजने अर्शानला घेऊन रात्री ८.१५ वाजता उपचारासाठी स्वाराती रुग्णालय गाठले. 

 

 

मात्र, यावेळी साकीब जहीर पठाण, जहागीरमिर पठाण, दौलत मिर पठाण, साहील पठाण, सोहल नाजखन मिरखान पठाण, साकेब पठाण, आफताब अखीब शेख, मुशरफ माजीद शेख, पठाण फरद्यीम मिरखान, कलीम नियामत पठाण, माज पठाण, फेरोज पठाण, इफाजत मिरखान पठाण, नदीम जलील शेख, शारुख मिरखान पठाण आणि अख्तरखान पठाण (सर्व रा. सदर बाजार, अंबाजोगाई) हे १६ जण लोखंडी रॉड, काठ्या घेऊन तिथे आले आणि फेरोज आणि त्यांच्या सोबत असलेले शाहबाज मुस्तफा कुरेशी, मोबीन मुख्तार कुरेशी, अकबर कुरेशी आणि आरशान कुरेशी यांना बेदम मारहाण सुरु केली. 

या मारहाणीत आरशान कुरेशी याच्या हाताला आणि अकबर कुरेशी यांच्या डोक्याला जबर इजा झाली. सदर फिर्यादीवरून सर्व १६ आरोपींवर कलम ३०७, ३२६, ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०६,१३५ अन्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक कांबळे करत आहेत. याप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

 

 

 पार्किंगच्या वादातून  झाली मारहाण

https://youtube.com/shorts/Oa0h8NUESck?feature=shared

Advertisement

Advertisement