केज- आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. केज तालुक्यातील औरंगपूर येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती नूसार केज तालुक्यातील औरंगपुर येथील हर्षदा दत्तात्रय फस्के ही १४ वर्षीय मुलगी आदर्श कन्या विद्यालय बनसारोळा येथे आठवीच्या वर्गात शिकत होती. हर्षदाला कुंबेफळ येथील संकेत राहुल शिंदे व सोमनाथ रघुनाथ डिवरे हे दोन तरुण त्रास द्यायचे. मोटारसायकल आडवी लावून आणि खडे मारून तिची छेड काढायचे.
हर्षदाने याबाबत आपल्या पालकांना याची माहिती दिली होती. त्यानंतर तिच्या वडीलांनी आणि चुलत्यांनी छेड काढणाऱ्या मुलांच्या पालकांना हा प्रकार सागितला होता. तसेच या दोन्ही मुलांना समज देण्यात आली होती. मात्र याचा काहीही फरक पडत नव्हता. हे दोघे सतत छेड काढत होते. दोन महीन्यांपूर्वी पुन्हा संकेत शिंदे व सोमनाथ डिवरे यांनी हर्षदाची छेड काढली. तु आमच्या सोबत चल असं तिला सांगितले त्यावेळी पुन्हा या दोघांना समज देण्यात आली होती.
२ एप्रिलला हर्षदाचा पेपरला गेली होती. तेव्हा तिला संकेत शिंदे व सोमनाथ डिवरे यांनी तु आमच्यासोबत चल नाहीतर तुला परीक्षा देऊ देणार नाही असा दम दिला होता. नंतर हर्षदाने ५ एप्रिलला दुसरा पेपर दिला, आणि घरी आल्यानंतर या दोघांनी दम दिल्याची माहिती दिली.
सतत छेडछाड होत हर्शदा मानसिक तणावात होती. यातून तिने ५ एप्रिल २४ ला दुपारी पेपर सुटल्यानंतर घरी येऊन निवांत बसली होती. दुपारी ३-४च्या सुमारास हर्षदाला चक्कर आली त्यावेळा तिने शेतात फवारणीसाठी आणलेले मार्शल नावाचे विषारी औषध पिल्याचे सांगितले. त्यानंतर तिला नातेवाईकांनी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा १२ एप्रिलला मृत्यू झाला.
या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात संकेत राहुल शिंदे आणि सोमनाथ रघुनाथ डिवरे रा. कुंबेफळ ता. अंबाजोगाई या दोघांविरुद्ध भादवि कलम ३०५ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे तपास करीत आहेत.
दरम्यान, टवाळखोरांच्या त्रासाला आणि त्यांच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन शाळकरी मुलीला जीव गमवावा लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.