Advertisement

 देवगिरी बंगल्यावरील बैठक संपली,७ जागांसाठी अजित पवार आग्रही

प्रजापत्र | Sunday, 24/03/2024
बातमी शेअर करा

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आठवडा उलटला पण अजुनही महायुतीमध्ये जागावाटपाचा  गुंता सुटलेला नाही. भाजपने महाराष्ट्रातील २० जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, पण अजुनही राहिलेल्या २८ जागांचा गुंता सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी ७ जागांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार सात जागांसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. 

 

आज सकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री यांच्यासमोर सातारा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तो मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा अशी मागणी केली होती, तर दुसरीकडे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपकडून तिकिट मिळावी, अशी मागणी केली आहे. 

 

 

या सात जागांसाठी अजित पवार आग्रही

महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेसाठी सात जागांची मागणी केली आहे. यात सातारा, धाराशीव, बारामती, रायगड, शिरुर, परभणी, गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे. तर दुसरीकडे सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली आहे. यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत आहेत.  दरम्यान, दोन दिवसात महायुतीच्या सर्व जागांच्या नावांची घोषणा होऊ शकते. शिवसेना १३ जागा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Advertisement

Advertisement