महायुती तसेच महाविकास आघाडीचे जाटावाटप आणि उमेदवारी अद्याप निश्चित होताना दिसत नाही. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच आंबेडकर यांनी केली. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत थेट शब्दांत भाष्य केले आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती आता राहिली आहे, असे मी म्हणणार नाही. याचे कारण म्हणजे आता वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग होण्याच्या प्रयत्नात आहे. चार पक्षांची चर्चा सुरू आहे. आधी फक्त ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली होती. ते आता राहिलेले नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही. पण, वंचितने महाविकास आघाडीत जायचे असेल, तर आधी आपण बसून चर्चा केली पाहिजे, असे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. धोरण ठरवले पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे. मग आपण तिकडे जायचे ठरवू. त्यातील काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत. काही लोक त्यांच्याशी बोलून आले. पण काही झाले नाही. त्यामुळे आता युती नाही. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती, नाही तर युती नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तुटल्याची घोषणा केली
वंचित बहुजन आघाडी आणि आमचे नाते जुने आहे. एकत्र आहे, याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला. ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातील समाजकारण जास्त करावे, ही भूमिका होती. आता प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तुटल्याची घोषणा केली. हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. युती करताना चर्चा झाली. तर आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती, तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झाले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.
दरम्यान, कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या करवीर संस्थानचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला. शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच काँग्रेस ४८ जागांवर लढत असेल तर ७ जागांवर पाठिंबा देऊ असे ते म्हणाले.