Advertisement

सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जातोय - शरद पवार

प्रजापत्र | Saturday, 23/03/2024
बातमी शेअर करा

ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढले आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यातून भाजपावर हल्लाबोल केला आहे.

 

 

इंदापूर येथे आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार उपस्थित होते.  शरद पवार म्हणाले की, "ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढले आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे. आज २०२४ वर्ष सुरू आहे तरीही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही."

"सरकारने कांदा निर्यातंबदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला. कापूस उत्पादक हवालदिल झाला. पण सरकारला त्याची काहीच काळजी नाही. प्रधानमंत्र्यांवर टीका केली, म्हणून दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री आज तुरुंगात आहेत. आज काँग्रेस पक्षाचे खाते गोठवले. उद्या तुम्ही विरोधात भूमिका घेतली, तर तुमचेही खाते बंद करतील. आघाडीचे उमेदवार निवडून आणणे हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे."

 

 

"या निवडणुकीत सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तीनदा तुम्ही त्यांना संधी दिली. देशाच्या संसदेत पहिले दोन जे खासदार आहेत. ज्यांची उपस्थिती ९८ टक्के आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर मांडणी करतात. संसदेत तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे. काम करणारी व्यक्ती संसदेत आहे. आज आपलं चिन्ह बदललं तुतारी लक्षात ठेवा आणि मतांचा विक्रम करा" असे आवाहन शरद पवार यांनी इंदापूरकरांना केले.

Advertisement

Advertisement