लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये एकाच दिवसामध्ये दोन उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी गुजरातच्या वडोदरा मतदारसंघाच्या खासदार आणि भाजप उमेदवार रंजन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता गुजरातच्या साबरकांठा येथून भाजप उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपने साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून भीकाजी ठाकोर यांना लोकसभेसाठी तिकिट जाहीर केलं होतं. त्यांनी आता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वीच वडोदरा येथून रंजनबेन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याचं जाहीर केलं. त्यांनी एक्सवर पोस्ट लिहीत, ''मी रंजनबेन धनंजय भट्ट. काही खासगी कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही.'' असं म्हटलं. त्यानंतर काहीच वेळात साबरकांठा येथील भाजप उमेदवार भीकाजी ठाकोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर निवडणूक न लढवण्याची घोषणा केली.
''मी भीकाजी ठाकोर. काही खासगी कारणांमुळे मी साबरकांठा येथून लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही'' अशी पोस्ट ठाकोर यांनी इन्स्टाग्रामवर केली. भट्ट यांना वडोदरा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा उमेदवारी देणाऱ्या भाजपविरोधात बॅनरबाजी झाली होती. त्यानंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी भट्ट यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. वडोदरा येथून तिसऱ्यांदा भट्ट यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप महिला सेलच्या उपाध्यक्ष ज्योतीबेन पंड्या यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.