Advertisement

 कापूस व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना घातला २२ लाखांचा गंडा 

प्रजापत्र | Friday, 22/03/2024
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - मागील पाच सहा वर्षातील व्यवहारांमुळे शेतकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत दोघा व्यापाऱ्यांनी परळी तालुक्यातील नागपिंपरी येथील ११ शेतकऱ्यांना तब्बल २१ लाख ६४ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी त्या दोन व्यापाऱ्यांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

 

 

याप्रकरणी नागपिंपरी येथील शेतकरी हनुमंत रुस्तुम मुंडे यांच्या फिर्यादीनुसार, अख्तर दस्तगीर पठाण (रा. कसबा पेठ, धारूर) आणि अलीम करीम शहा (रा. पात्रुड, माजलगाव) हे दोन व्यापारी त्यांच्या गावातून नेमी कापूस खरेदी करत असतात. कापूस विक्रीच्या निमित्ताने मागील पाच-सहा वर्षापासून हनुमंत मुंडे यांची त्यांच्यासोबत चांगली ओळख झाली. गतवर्षी त्या दोघा व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत पैसे घेण्यास थांबल्यास कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये भाव देण्याचे आमिष दाखवले. यापूर्वीच्या व्यवहारांमुळे हनुमंत मुंडे यांच्यासह ज्ञानोबा भागवत मुंडे, ज्ञानोबा किसन कोल्हापुरे, बळीराम लक्ष्मण मुंडे, आत्माराम श्रीरंग मुंडे, नवनाथ व्यंकटी शिंदे, मारोती ग्यानबा भोसले, विष्णू पाटील ढाकणे, रावण श्रीहरी मुंडे, बाबू रंगनाथ मुंडे आणि नवनाथ श्रीरंग मुंडे यांनी एप्रिल ते जून या कालावधीत एकूण २१ लाख ६४ हजार रुपये किमतीचा २२५ क्विंटल कापूस त्या व्यापाऱ्यांना विश्वासाने दिला. मात्र हा कापूस  शहागड येथल जिनिंगला विक्री करूनही त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटूनही त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात तक्रार नोंदवली. सदर तक्रारीवरून अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम करीम शहा या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र घुगे करत आहेत.

Advertisement

Advertisement