मागील अनेक दिवसांपासून कराळे गुरुजी म्हणजेच नितेश कराळे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांनी आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे.
मी मागे काही भेटी घेतल्या आहेत. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल, तर मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक नक्की लढवेल, असं कराळे गुरूजींनी सांगितलं आहे. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे, असंही नितेश कराळे माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटले आहेत.
कराळे गुरुजी घेणार शरद पवारांची भेट
असंविधानिक सरकार चुकीचे निर्णय घेत आहेत. प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो, हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो होतो. महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो, पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक आहेत, असं कराळे गुरूजींनी म्हटलं आहे.एक तरुण पिढी आणि युवकांनी राजकारणात यावं, असं कराळे गुरूजींचं मत आहे. अपक्ष लढतीबाबत आता सांगता येणार नाही, मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय होईल, असं कराळे गुरूजी यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधताना सांगितलं आहे.