भाजप लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मोदी की गॅरंटी देत उतरलीय. आता काँग्रेसनेही देशातील युवकांना गॅरंटी दिलीय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुणांसाठी पाच गॅरंटी दिलीय. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी मध्य प्रदेशातून राजस्थानमध्ये पोहोचली. येथे राहुल गांधी यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथेही जाहीर सभा घेतली. त्यावेळी राहुल गांधी यांनी ह्या गॅरंटीची घोषणा केलीय.
भर्ती करणार
काँग्रेसने केंद्र सरकारमध्ये 30 लाख नोकऱ्यांची हमी दिली आहे. काँग्रेसने सांगितले की ते एक कॅलेंडर जारी करेल आणि त्यानुसार भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करेल.
शिकाऊ उमेदवारांना मिळणार पगार
नवीन शिकाऊ अधिकार कायदा प्रत्येक डिप्लोमाधारक किंवा महाविद्यालयीन पदवीधरांना सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील कंपनीमध्ये एक वर्षाची शिकाऊ (प्रशिक्षण) देण्यात येणार असल्याची गॅरंटी राहुल गांधींनी दिली. प्रशिक्षणार्थींना महिना साडे आठ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
पेपरफुटी थांबणार
काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर पेपरफुटीपासून मुक्ती मिळवून देऊ अशी गॅरंटी राहुल गांधींनी दिलीय. पेपरफुटी रोखण्यासाठी कायदे करण्याची गॅरंटी काँग्रेस देत असल्याचं राहुल गांधी म्हणाले. कोट्यवधी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणारे नवे कायदे आणून आम्ही पेपरफुटी पूर्णपणे थांबवू, असं राहुल गांधी राजस्थानच्या सभेत म्हणाले. दरवर्षी रोजगार शोधणाऱ्या लाखो तरुणांसाठी चांगली कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कायदा आणणार.
युवा रोशनी
काँग्रेस पाच वर्षांच्या कालावधीसाठी देशातील सर्व जिल्ह्यांना वाटप करण्याच्या सुविधेसह ५ हजार कोटी रुपयांचा निधी तयार करेल. ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण कोणत्याही क्षेत्रातील असो त्यांच्या व्यवसायासाठी स्टार्ट-अप निधी देऊ अशी गॅरंटी सुद्धा राहुल गांधींनी दिलीय.
दरम्यान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका पोस्टद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. गेल्या १० वर्षातील अन्यायाचा काळ होता, त्यात भयंकर बेरोजगारीच्या संकटाचा होता. अन्यायाच्या या काळात लाखो शिक्षित आणि महत्त्वाकांक्षी तरुणांना त्यांचे आर्थिक भविष्य सुधारण्यापासून किंवा राष्ट्र उभारणीत योगदान देण्यापासून वंचित ठेवले गेले. आम्ही तरुणांसाठी अशी पावले उचलू जेणेकरून प्रत्येक तरुण आपले भविष्य सुरक्षित करू शकतील आणि राष्ट्र उभारणीत योगदान देऊ शकतील, असं जयराम रमेश म्हणालेत.