Advertisement

टीईटी परीक्षा होणार ऑफलाइन

प्रजापत्र | Wednesday, 06/03/2024
बातमी शेअर करा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)चे यंदा प्रथमच ऑनलाइन माध्यमातून घेण्याचे नियाेजित केले हाेते. मात्र, तांत्रिक तसेच माध्यमनिहाय परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यावर्षी हाेणारी टीईटी परीक्षा ऑफलाइन माध्यमातून घेण्याचे ठरविले आहे. राज्य शासनाने ऑफलाइन परीक्षा घेण्यास परवानगी दिली असून, त्या दृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे नियाेजन केले जात आहे.

राज्यात विविध परीक्षांचे ऑनलाइन माध्यमातून आयाेजन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेनेही टीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने तयारीही सुरू केली हाेती. मात्र, इंग्रजी, मराठी, उर्दू अशा माध्यमांमध्ये परीक्षा घेणे अडचणी ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे परिषदेने टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयाेजित करावी, याबाबत राज्य शासनाकडे विनंती केली. शासनाने हिरवा कंदील दाखवला असून, ऑफलाइन परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात ऑफलाइन पद्धतीने टीईटी परीक्षेचे आयाेजन केले जाणार आहे. मागच्या वेळी टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी काटेकाेरपणे परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे.

शिक्षक हाेण्यासाठी टेट परीक्षा देण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे. राज्यात सध्या २१ हजार ६७८ पदांवर शिक्षक भरती सुरू आहे. तसेच आगामी काळातही रिक्त जागांवर शिक्षक भरती हाेऊ शकते. त्यामुळे पुढील टीईटी परीक्षा केव्हा होणार यांची अनेक उमेदवार वाट पाहत आहेत.

 

उमेदवारांच्या संख्येत घट हाेणार ?
राज्यात नाेव्हेंबर २०२१ मध्ये ४ लाख ६८ हजार ६७९ उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली हाेती. त्यामध्ये १७ हजार ३२४ म्हणजेच ३.७० टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले हाेते. उमेदवारांना सध्या सीटीईटी परीक्षेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच डी.टीएड पदविकेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मागील काही वर्षात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे यंदा उमेदवारांचे अर्ज घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

Advertisement