बीड- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे. अशा परिस्थितीत दुष्काळ उपाययोजना अद्यापही आखल्या नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. बीड तालुक्यातील सौंदाना येथे दोन महिन्यांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून मागणी करूनही टँकर सुरू होत नसल्याने सोमवारी (दि.४) गावकर्यांनी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. दरम्यान सरपंचासह ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
बीड तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासाठी टँकरची मागणी होऊ लागली. बीड तालुक्यातील सौंदाणा येथे दोन महिन्यांपासून टंचाई जाणवत आहे. गावकर्यांनी अनेक वेळा टँकरची मागणी केली मात्र याची दकल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली नाही. ग्रामपंचायतही कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याने सोमवारी (दि.४) गावकर्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली. तात्काळ टँकर मंजूर करावे, अशी मागणीही या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन पंचायत समितीच्या अधिकार्यांना देण्यात आले.