परभणी - स्मशानभूमी म्हंटल की तिथे अंत्यसंस्कार आणि दुःखाचे आवाज कानी पडतात. मात्र परभणी जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत मंगलाष्टकांचे सूर आणि अक्षतांसोबत आनंदाची उधळण बघायला मिळाली. स्मशानभूमीत चक्क थाटामाटात अनोखा विवाह सोहळा पार पडला असून या विवाह सोहळ्याची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर, अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येकजण आपले लग्न कायम आठवणीत राहण्यासाठी अनेक हटके प्रकार असतात. लग्नासाठी हटके डेस्टिनेशन, आलिशान हॉल शोधत असतात. मात्र परभणी जिल्ह्यातील एका जोडप्याने चक्क स्मशानभूमीत लग्नगाठ बांधली आहे. या हटके, आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
स्मशानभूमी म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भिती निर्माण होते. त्यामुळेच परभणी शहरातील स्मशानभूमीमध्ये साईनाथ जाधव आणि लक्ष्मी मिरेवाड सर्वसामान्य नागरिकांच्या मनामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सात जन्माची गाठ बांधली आहे. नागरिकांच्या मनामध्ये असलेली भीतीचे वातावरण दूर करणे हाच उद्देश असल्याने त्यांनी या ठिकाणी लग्न केले असल्याचे नातेवाईक सांगत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारंवार अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र समाजामध्ये अंधश्रद्धा कायमच असल्याने स्मशानभूमीमध्ये लग्न करण्याचा निर्णय या दोन्ही परिवारांनी घेतला आहे. स्मशानभूमीमध्ये लग्न लावून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.