नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये न जाता अपक्ष निवडणूक लढविण्याची मागणी स्वभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. त्यासाठी जरांगे यांनी सभागृहात जावे. ऊसाला हमीभाव मिळावा यासाठी राजू शेट्टी संसदेत गेलेत, तसेच जरांगे पाटील यांनीही सभागृहात जाण्याची मागणी करण्यात आली आहे. आता मनोज जरांगे पाटील हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवावी
जसे राजू शेट्टी यांनी आयुष्यभर रस्त्यावरती शेतकऱ्यांसाठी लढा लढला. पण त्याच्यासोबत ते संसदेत गेले आणि ऊसाला हमीभाव मिळण्यासाठी काय करून घेतला. जे चुकीचे भूमी अधिग्रहण बिल होते ते उधळून लावले. राजू शेट्टी संसदेत होते म्हणून हे शक्य झाले. तसेच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवे असल्यास मनोज जरांगे पाटील यांनी संसदेत जायला हवे. लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवायला हवी.
...तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जरांगेंना पाठींबा
जालना मतदार संघातून ते निवडणुकीसाठी उभे राहणार असतील तर त्यांनी स्वतंत्र उभे राहावे, अशी आमची मागणी आहे. त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीसोबत लढू नये. मनोज जरांगे पाटील हे जर निवडणूक लढवणार असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यांना पाठींबा असेल, असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.