मुंबई : राज्यात होणारा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पॅरावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये परिचर्या अभ्यासक्रम महाविद्यालय (बीएससी नर्सिंग) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये १०० विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यामध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ७०० जागा वाढणार आहेत.
शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळावे यासाठी राज्यात नवीन परिचर्या महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रत्येक महाविद्यालयामध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या १०० जागा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
त्यामुळे लवकरच राज्यामध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ७०० जागा वाढणार आहेत. जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), कोल्हापूर, नंदुरबार व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या जागा वाढणार आहेत. केंद्र सरकारच्या परिचर्या शिक्षण योजनेअंतर्गत नंदुरबार व गोंदियामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांत नवीन परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. या ७ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय परिचर्या पदवी महाविद्यालयांकरिता प्रथम चार वर्षांसाठी सुमारे २०६ कोटी ८५ लाख रुपये तर पाचव्या वर्षापासून १६ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.