यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू असताना मंडप कोसळून चार जण गंभीर झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाची यवतमाळमध्ये तयारी सुरू असून भव्य मंडप उभारला जात आहे. भारी गावात २६ एकर जागेवर हा मंडप उभारण्यात येत आहे.त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असताना त्याचा पिलर जमिनीतून निखळला त्यामुळे त्याचे खांब खाली तीन क्रेन वर कोसळले. त्याखाली काही कामगार काम करत होते. या दुर्घटनेत चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेतील जखमी मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढल्याचे दिसत आहे. गेल्या चार महिन्यांत पंतप्रधान मोदींचा हा चौथा महाराष्ट्र दौरा आहे.