सोलापूर- चहा पिण्यासाठी रेल्वेगाडीतून खाली उतरलेल्या एका सराफाची सुमारे ११ लाख ८१ हजार रूपयांचा सोन्याचे दागिने व रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी क्षणार्धात लांबविल्याचा प्रकार कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर घडला.
कोल्हापुरात राहणारे भारत रामचंद्र हसूरकर हे सराफ सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय करतात. ते कोल्हापूरहून कलबुर्गी (कर्नाटक) येथे सोन्याचे दागिने विकण्यासाठी गेले होते. तेथून रेल्वेने कोल्हापूरला परत निघाले असताना कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सकाळी दहा वाजता गाडी थांबली होती. तेव्हा चहा-नाष्टा घेण्यासाठी गाडीतील काही प्रवासी उतरले. तेव्हा हसूरकर हे आपली किंमती ऐवज असलेली पिशवी गाडीत आसनावर तशीच ठेवून चहा पिण्यासाठी गाडीतून खाली उतरले. नंतर थोड्याच वेळात गाडीत आले. तेव्हा त्यांची पिशवी गायब झाली होती. पिशवीमध्ये आठ लाख ३१ हजार रूपये किंमतीचे १३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि साडेतीन लाखांची रोकड असा एकूण ११ लाख ८१ हजार रूपये किंमतीचा ऐवज होता. चहा पिण्यासाठी रेल्वेतून उतरणे हसूरकर यांना चांगलेच महागात पडले.