लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखांबाबत मोठी अपडेट समोर आली. निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांनी आधीच तयारी सुरू केली आहे. आता निवडणूक आयोग लवकरच सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करू शकते.
निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकारी देशातील अनेक राज्यांना भेटी देत आहेत. दरम्यान, १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे. ७-८ टप्प्यात मतदान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक आयोग १३ मार्चनंतर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करू शकते. देशातील निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तसेच कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियाचे नियोजन करता येईल, याचा आढावाही त्यांच्याकडून घेतला जात आहे. सध्या निवडणूक अधिकाऱ्यांची टीम तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर ते उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १३ मार्चपूर्वी राज्याचे दौरे पूर्ण होणार असल्याचा दावा इंडिया टुडेच्या बातमीत करण्यात आला आहे. अशातच १३ मार्च रोजी किंवा त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, एनडीए आणि इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. एकीकडे एनडीए मजबूत स्थित दिसत आहे. तर इंडिया आघाडीतने अनेक पक्ष त्यांना सोडून जात असल्याचं चित्र होतं. मात्र या आठवड्यात पुन्हा इंडिया आघाडी मजबूत होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षात युती झाली असून तिथे हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहेत.तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ज्या इंडिया आघाडीपासून दुरावल्या होत्या, त्याही पुन्हा एकदा आघाडीत सामील होऊ शकतात, अशी चर्चा आहे. तसेच टीएमसी आणि काँग्रेसमध्ये पश्चिम बंगालच्या लोकसभा जागांबद्दल चर्चा सुरु असल्याचं वृत्त आहे. तर यंदा भाजपने अब की बार ३७० पारचा टार्गेट ठेवला आहे. तर एनडीएचा ४०० पारचा टार्गेट आहे.