मुंबई - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढवतील तसेच विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केवळ संख्याबळावर होणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना फडणवीसांनी ही माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोगानं महायुतीतील तिन्ही पक्षांना चिन्ह दिलं आहे. त्यामुळं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हे तिन्ही पक्षा आपापल्या चिन्हावरच लढतील. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील आमदार-खासदार हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुका लढवणार नाहीत, असही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा केवळ संख्याबळाच्या जोरावर होणार नाही. तर याबाबतचा निर्णय हा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींमार्फत घेतला जाईल, असं स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिलं आहे.