आज सकाळपासूनच एका मोठ्या बातमीने वृत्तवाहिन्यांचा पडदा व्यापला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातमीने राज्यासह देशात खळबळ उडाली होती. या बातमीबाबत आता शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार अनिल देशमुख , शशिकांत शिंदे यांनी पवार गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.
पुण्यातील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे , अमोल कोल्हे, यांच्यासह सर्व आजी-माजी आमदारांचीही उपस्थिती होती.
'असे काही होणार नाही' - देशमुख
काँग्रेसमध्ये शरद पवार गटाचे विलीनीकरण होणार नाही, असे आमदार अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले. आजच्या बैठकीत राज्यसभा, लोकसभा निवडणुका तसेच चिन्ह आणि मेळावा यावर चर्चा झाल्याचे दोघांनी सांगितले.
ही तर 'पवार' नावाची भीती - जगताप
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बातमी धडकली आणि त्यावर सत्ताधारीतील काही नेत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या. याबाबत शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही बातमी साफ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पवार नावाची भीती वाटत असल्याने अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असा पलटवार प्रशांत जगताप यांनी केला.