पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयांनंतर शरद पवार काय भूमिका घेणार, काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शरद पवार यांनी अद्यापही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर सहा दिवसांनी शरद पवार यांनी याबाबत जाहीर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणालेत शरद पवार?
"मी पहिली निवडणूक दोन बैलजोडीच्या चिन्हावर लढलो. आमचे चिन्हे गेले, मग आम्ही चरख्यावर लढलो. त्यानंतर आम्ही हातावर लढलो, ते गेल्यानंतर घड्याळ चिन्ह आलं. त्यामुळे लोकांचा दृष्टीने काम, विचार हा महत्वाचा असतो. चिन्ह मर्यादित काळासाठी उपयुक्त असतं," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तसेच "निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. आमचे चिन्हचं घेतले नाही तर पक्षच काढून घेतला. ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी उभारी दिली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्याला देणे, असा प्रकार य़ा देशामध्ये या आधी कधी झाला नव्हता. ते सुद्धा निवडणूक आयोगाने करुन दाखवले. माझी खात्री आहे, लोक या गोष्टीला समर्थन देणार नाहीत, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच आम्ही "सुप्रीम कोर्टात जाऊ, आणि त्यासंबंधीचे निर्णय लवकर येतील अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले. अद्याप कोणत्याही चिन्हाची मागणी केली नाही. सोमवारी किंवा मंगळवारी चिन्हाबाबत आम्ही निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार आहोत. त्यावेळी नवे चिन्ह स्पष्ट होईल, "असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.