पुणे - आगमी निवडणुका महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं म्हटलं जात आहे. मात्र महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न कायम आहे. अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री बनवायचं असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्यांनी केला आहे. २०२४ मध्ये अजित पवारांना राज्याचा मुख्यमंत्री बनवायचं असं धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटलं.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा मिशन मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. अजितदादा आणि आम्हा सर्वांवर मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही. आता ते जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी तुम्ही सर्वांनी ठेवा, असा इशारा धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना दिला आहे. अजित दादांनी आम्हाला उभं केलं. त्यांच्यामुळेच आम्ही आमदार झालो. आता सर्व पक्षाचा विचार केला तर सर्वात तरुण आमदार हे दादांनी निवडून आणलेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलं आहे. २०२४ साली आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचं आहे, ते स्वप्न आपण बाळगलं आहे. त्यासाठी निवडणुकीत उभे राहणारे आणि पडद्यामागे असणाऱ्या सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी. तेव्हा २०२४ मध्ये अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.२ जुलैला आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला. त्यानंतर ५ जुलैच्या सभेला खऱ्या अर्थाने लोकशाही दिसली. ती लोकशाही आज ही इथे आहे. ६ फेब्रुवारीला त्या लोकशाहीचा विजय झाला. पक्ष आणि चिन्हही आपलं झालं. आता इथून पुढे फक्त अजित पर्व असणार. पुढची ५० वर्षे ही दादांचीच आहेत, असं धनंजय मुंडें यांना कार्यकर्त्यांना सांगितलं .