मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याने केला होता. तर, मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी १ पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहे.
मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून तपासाला सुरवात झाली आहे. पोलिसांनी गोळीबार करणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीखला रात्रीच ताब्यात घेतले आहे. सोबतच रोहित साहू नावाच्या आणखी एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं, हत्या करण्याचे कारण काय?, घोसाळकर आणि मॉरिसमधील कोणता वाद होता? या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून आता तपास केला जात आहे. विशेष म्हणजे मॉरिस नोरोन्हा याचा पीए मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.