मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ संपण्याचं नाव घेत नाही आहे. विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षांचे पेपरफुटीचं प्रकरण ताजं असतानाच परीक्षा विभागाचा आणखी एक नवा गोंधळ समोर आला आहे. मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण विभागातर्फे आज होऊ घातलेल्या प्रथम वर्ष/सत्र पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम परीक्षेला फायनान्शियल मॅनेजमेंट ऐवजी फायनान्शिअल अकाउंट विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला.
विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर आजचा पेपर रद्द करण्यात आला आहे. आज रद्द करण्यात आलेला पेपर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. मात्र दूरस्थ शिक्षण विभाग येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपला नोकरीधंदा करुन शिक्षण घेत असतात त्यांना सुट्टया मिळणे कठीण असते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच त्यांना प्रचंड मानसिक तणावाला देखील सामोरे जावे लागत आहे.
मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण विभागातर्फे प्रथम वर्ष/सत्र पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम (MMS) परीक्षेला आज पासून सुरुवात झाली आहे. दुरुस्त शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या एमएमएस या अभ्यासक्रमासाठी साधारणपणे दीडशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण नोकरी किंवा काम धंदा करून परीक्षेची तयारी करत आहेत. आज पासून सुरू झालेल्या या परीक्षेमध्ये मुंबई विद्यापीठ दुरुस्त शिक्षण विभागाच्या परीक्षा विभागाने मोठा गोंधळ घातला आहे. विद्यार्थ्यांचा आज फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयाचा पेपर होता मात्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना फायनान्शिअल अकाउंट विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातात पेपर पडतात प्रश्नपत्रिका वाचून विद्यार्थ्यांना मोठा धक्काच बसला यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या प्रमुखांना ही बाब लक्षात आणून दिली.
मुळात नियमानुसार ज्या विषयाचा पेपर असतो त्याचे तीन प्रश्नसंच तयार ठेवणे अपेक्षित असताना आज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून अशी कोणतीच सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली नाही. प्रश्नपत्रिकाच्या हेडलाईनमध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट असे लिहिले मात्र आज देण्यात आलेले प्रश्न हे संपूर्णपणे फायनान्शिअल अकाउंट विषयाचे असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला परिणामी आजची परीक्षा विद्यापीठाकडून रद्द करण्यात आली आहे.