स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, आर्थिक आघाडीवर भारताची प्रगती चांगली झाली आहे. भारताने आर्थिक आव्हानांचा चांगला सामना केला आहे. आम्ही भू-राजकीय समस्या हाताळण्यास सक्षम आहोत.
गेली 4 वर्षे जगासमोर आव्हानांनी भरलेली आहेत. मात्र या सर्व आव्हानांवर मात करण्यात भारताने यश मिळवले आहे. महागाई आणि किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI प्रयत्न करत आहे. गेल्या 5 वर्षांत आर्थिक क्षेत्रात बरीच स्थिरता आली आहे. सध्या देशातील 75 टक्के उत्पादन क्षमतेचा वापर केला जात आहे.
देशातील ठेवींची वाढ 12-13 टक्के
आरबीआय गव्हर्नर पुढे म्हणाले की, आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीडीपी वाढ 7 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. एनएसओचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीडीपी वाढ 7.4 टक्के राहील. पुढील वर्षीही ही वाढ कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील ठेवींची वाढ 12-13 टक्के झाली आहे.
असुरक्षित कर्जाबद्दल आरबीआय अलर्ट
शक्तीकांता दास पुढे म्हणाले की, आरबीआय असुरक्षित कर्जाबाबत जागरूक आहे. क्रेडिट इकोसिस्टमचे निरीक्षण केले जात आहे. यामध्ये अडचणींना तोंड देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. बँकांच्या कारभारात सुधारणा झाली आहे.