बडोदा : सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांची बोट उलटून १४ विद्यार्थी व दोन शिक्षकांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी घडली. काही विद्यार्थी व शिक्षक बेपत्ता असून शोध सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. धक्कादायक म्हणजे विद्यार्थी लाइफ जॅकेटशिवाय बोटीतून प्रवास करत होते.
एका शाळेची सहल गुरुवारी बडोद्याच्या हर्णी वॉटर पार्क व तलाव येथे आली होती. एकूण २७ विद्यार्थी व ४ शिक्षकांना बोटचालकाने लाइफ जॅकेटशिवाय बोटमध्ये बसवले. क्षमतेपेक्षा अधिक जणांना बसविल्याने ती उलटली. माहिती मिळताच अग्निशमन आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले.
सुरुवातीला सहा विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले, तर अनेक जण बेपत्ता होते. काही वेळाने १४ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचे मृतदेह हाती लागले. सदर घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसदारांना २ लाखांची, तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली.