अहमदनगर- महायुतीच्या मेळाव्यादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा विक्रम वेताळ असा उल्लेख केला होता. या टीकेला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजप सोबत गेल्याने व्हायरसची लागण झाली आहे असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं आहे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असेल तर आम्ही देखील पुढे काय करायचे ते ठरवू असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळावे घेतले जात आहेत, त्यांना असे मेळावे घ्यावेच लागतील. कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती जनतेला पटलेली नाही. ती पटवून देण्याचा प्रयत्न ते महायुती मेळाव्याच्या माध्यमातून करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. सोबतच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे देखील मेळावे होतील असं त्यांनी सांगितलं.
शरद पवार गटातील सहा ते सात मोठे नेते अजित पवारांच्या गटात येणार असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. यावर बोलताना अजित पवार गटाचेच काही नेते भाजपच्या संपर्कात आहेतच, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे नेते राहतील का हे पहावं लागेल, त्यांच्यातील बहुतांश लोकांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय.