Advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'एका' कंपनीला भीषण आग 

प्रजापत्र | Sunday, 31/12/2023
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसी परिसरातल्या एका कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये 'सनशाइन इंटरप्राईजेस' कंपनीत रविवारी ही घटना घडली आहे. मृत्यूमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग भडकतच आहे. 

 

 

सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीत रबरी हातमोजे बनवण्याचे काम केले जाते. १५ कामगारांसह एक महिला व दोन लहान मुले असे एकूण १८ जण येथे काम करतात. या कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे रहिवासी आहेत. शिवाय एकजण पश्चिम बंगाल व शेजारच्या गावातील आहे. अग्नीतांडवात मृत झालेल्यांमध्ये एका ज्येष्ठ कामगाराचा समावेश आहे. त्याशिवाय एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (३२), इक्बाल शेख (१८), ककनजी (५५), रियाजभाई (३२), मरगुस शेख (३३) या कामगारांचा मृत्यू झाला आहे.

 

 

काही कामगारांचा धूरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. कामगार झोपेत असताना ही आगीची घटना घडली आहे. काही जणांनी छतावरून झाडाच्या सहाय्याने उड्या मारल्या. आग भडकल्याने सहा कामगार आतच अडकले होते.आगीची माहिती मिळाल्यानंतर वाळूज अग्निशमन दलाचे दोन बंब, बजाज ऑटो कंपनीचा एक, महापालिकेचे दोन व चिकलठाणा अग्निशमन दलाचा एक अशा ६ बंबांसह वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. सुरूवातीला आतमध्ये अडकून पडलेल्या सहा कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

Advertisement

Advertisement